MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन सहायक कक्ष अधिकारी, ऋतुजा पाटीलचे वडील आणि प्रियकर गौरव पाटील यांचा समावेश आहे. ऋतुजा पाटील हिच्या प्रेम प्रकरणामुळे या पेपरफुटीचा भांडाफोड झाला. यानंतर एमपीएससीने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासात दोन सहायक कक्ष अधिकारी, गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटीमागे एका प्रेम प्रकरणाचा अँगल समोर आला आहे. मुख्य लाभार्थी ऋतुजा पाटील हिने तिच्या वडिलांच्या मदतीने हा पेपर मिळवला होता. ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेऊन एमपीएससी अधिकाऱ्यांशी संगनमत केले होते.
ऋतुजाने हा पेपर आपला प्रियकर गौरव पाटील याच्यासोबत शेअर केला होता. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ऋतुजा आणि गौरव यांच्यात वाद होऊन ब्रेकअप झाले. याचा राग मनात धरून गौरव पाटीलने एमपीएससीकडे तक्रार केली, ज्यामुळे ही पेपरफुटी उघडकीस आली. या प्रकरणानंतर एमपीएससीने तातडीने बैठक घेऊन औषध निरीक्षक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली असून, यात तीन एमपीएससी अधिकारी, अमृत पाटील, गौरव पाटील आणि दलाल प्रवीण पाटील यांचा समावेश आहे. ऋतुजा पाटीलला मात्र अद्याप अटक न करता केवळ नोटीस बजावण्यात आली आहे.
