मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं

मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं

| Updated on: Sep 01, 2026 | 11:53 AM

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात महागाईने डोके वर काढले आहे. दूध, सीएनजी, पीएनजी आणि चहासह अनेक दैनंदिन गरजांच्या वस्तू आजपासून महाग झाल्या आहेत. पशुखाद्याच्या वाढलेल्या दरांमुळे दुधाचे भाव वाढले, तर सीएनजी आणि गॅसच्या दरवाढीमुळे चहा आणि सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासूनच सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. उत्पन्नात वाढ झाली नसली तरी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र वेगाने वाढत आहेत. जागतिक घडामोडींचाही यावर परिणाम होत आहे. इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यातील संघर्षामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच वाढले होते. आता यापाठोपाठ खाद्यतेल, साखर, डाळी आणि भाजीपाल्याच्या दरांनीही उसळी घेतली आहे. सध्या सरकारने साठेबाजीला लगाम घातल्यामुळे साखरेचे दर काही प्रमाणात नियंत्रणात आले असले तरी, इतर अनेक वस्तूंमध्ये दरवाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात आजपासूनच अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमतीत वाढ लागू झाली आहे. यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे दुधाच्या दरातील वाढ. मुंबईमध्ये म्हशीच्या सुट्या दुधाचे दर प्रतिलिटर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ झाली आहे. हे सुधारित दर आजपासून २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत, म्हणजेच सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असतील. दूध उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार, पशुखाद्य, पेंडी आणि चाऱ्याच्या दरात तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे त्यांना दरवाढ करणे भाग पडले आहे. या दरवाढीमुळे मिठाई, चहा, इतर दुग्धजन्य पदार्थ आणि दररोज दूध खरेदी करणाऱ्या लाखो कुटुंबांवर थेट आर्थिक भार पडणार आहे.

दुधापाठोपाठ चहाचे दरही वाढले आहेत. मुंबईसह आसपासच्या परिसरात १० रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता १२ रुपयांना विकला जाईल. काही ठिकाणी ही दरवाढ दोन दिवसांपूर्वीच लागू झाली असली तरी, अनेक ठिकाणी ती आजपासून लागू झाली आहे. गॅस आणि साखरेची दरवाढ झाल्यामुळे चहाचे दर २ रुपयांनी वाढवण्यात आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

इंधनाच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आजपासून सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीची सुधारित किंमत आता ८८ रुपये प्रति किलो झाली आहे. पुण्यातही आजपासून सीएनजीची सुधारित किंमत ९७ रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे धोरण अजूनही अस्पष्ट असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सीएनजी वाहने खरेदी करत आहेत. मात्र, आता सीएनजीचे दरही शंभरीकडे झुकू लागले आहेत. सीएनजीच्या वाढलेल्या दरांचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या लोकांना थेट बसणार आहे, कारण आजपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात रिक्षा आणि टॅक्सीचे दर २ रुपयांनी वाढणार आहेत.

घरगुती वापराच्या पीएनजी गॅसच्या दरांमध्येही आजपासून १ रुपयाची वाढ झाली आहे. ५३ रुपये प्रति एससीएम असलेला हा दर आता ५४ रुपये प्रति एससीएम इतका झाला आहे. इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यातील युद्धामुळे मोठ्या प्रमाणात एलपीजीची टंचाई निर्माण झाली होती. भविष्यातील धोका ओळखून आता केंद्र आणि राज्य सरकारने पीएनजीचे नेटवर्क विस्तारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शहरी भागात पीएनजीचे नेटवर्क वेगाने विस्तारत असून, दररोज शेकडो नवे कनेक्शन जोडले जात आहेत. आजपासून मुंबई आणि महानगर परिसरात पीएनजीच्या दरांमध्ये झालेली ही वाढ देखील सामान्य ग्राहकांना महागाईचा अनुभव देईल.

एकंदरीत, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबई आणि महाराष्ट्रातील नागरिकांना विविध वस्तू आणि सेवांच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. ही दरवाढ केवळ दैनंदिन खर्चात वाढ करत नाही, तर कुटुंबांच्या मासिक बजेटवरही परिणाम करत आहे.

Published on: Sep 01, 2026 11:51 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us