मुंबईमध्ये उष्णतेची लाट तीव्र; तापमान थेट 39 अंशांवर

| Updated on: Mar 05, 2026 | 11:23 AM

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत पारा आणखी वाढण्याचा अंदाज असून, भारतीय हवामान विभागाने मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकणपट्ट्याला येलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सकाळच्या वेळीही कडाक्याचे ऊन जाणवत असल्याने, दादर चौपाटीसारख्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या घटली आहे. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल्स आणि पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन फिरताना दिसत आहेत.

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात तीन अंशांनी वाढ झाली आहे. दुपारनंतर मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. फेब्रुवारीतील ३६.३ अंशांच्या तुलनेत मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाने उच्चांक गाठला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकणपट्ट्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि उष्णता टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Mar 05, 2026 11:23 AM
Follow Us