अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूरमधील ऐतिहासिक अंबाझरी तलावाची पाहणी केली. एकेकाळी नागपूरचे वैभव मानला जाणारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला हा तलाव मध्यंतरीच्या काळात जलपर्णीमुळे पूर्णपणे झाकोळून गेला होता. त्यामुळे नागपूरकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती की हा तलाव कायमचा नामशेष होणार की काय. या गंभीर परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेने उत्तम काम करत […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूरमधील ऐतिहासिक अंबाझरी तलावाची पाहणी केली. एकेकाळी नागपूरचे वैभव मानला जाणारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला हा तलाव मध्यंतरीच्या काळात जलपर्णीमुळे पूर्णपणे झाकोळून गेला होता. त्यामुळे नागपूरकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती की हा तलाव कायमचा नामशेष होणार की काय.
या गंभीर परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेने उत्तम काम करत संपूर्ण जलपर्णी हटवली. आज हा तलाव पुन्हा खळखळ वाहू लागला असून पाणी भरपूर आहे. फडणवीस यांनी स्वतः नौकाविहाराचा आनंद घेतला. त्यांनी महानगरपालिकेच्या या कामाचे कौतुक केले आणि आभार मानले.
आता अंबाझरी तलावाला एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. वाडी येथील 13 एमएलडीचा एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) पुढील दोन-तीन महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याने वाडी नगरपालिका आणि एमआयडीसीचे प्रदूषित पाणी या तलावात येणार नाही, ही एक मोठी समस्या मिटणार आहे. येथे सध्या तरुण-तरुणींना कयाकिंगचे प्रशिक्षण दिले जात असून, जलक्रीडा प्रकारांमध्ये भारताला अधिक पदके मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
