Ashok Kharat Case SIT PC UNCUT | नाशिक भोंदू बाबा प्रकरण: 11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, आरोपीविरुद्ध एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे, जादूटोणा आणि फसवणूक यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांची बदनामी झाल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर तपासासाठी नियुक्त विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील महत्त्वाची माहिती दिली.
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, आरोपीविरुद्ध एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे, जादूटोणा आणि फसवणूक यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांची बदनामी झाल्याची बाब समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर तपासासाठी नियुक्त विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील महत्त्वाची माहिती दिली. सातपुते यांनी सांगितले की, आरोपी अशोक खरात हा पीडितांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. तो महिलांना दैवी शक्ती असल्याचे सांगून त्यांना भीती दाखवत असे. कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवणे, बदनामीची धमकी देणे अशा प्रकारांनी तो महिलांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच खडे, चिंचोके यांसारख्या वस्तूंच्या माध्यमातून पैसे उकळत होता. ईशान्यश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण करून अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.
पुढे बोलताना सातपुते यांनी नमूद केले की, समाजात काय म्हणतील या भीतीमुळे अनेक महिलांनी अन्याय सहन केला. मात्र, आता त्यांनी धाडसाने पुढे येत गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, पीडितांची ओळख उघड करू नये, त्यांचे व्हिडिओ शेअर करू नयेत किंवा मोबाईलमध्ये ठेवू नयेत, कारण यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सायबर पथकाने या प्रकरणात मोठी कारवाई करत आतापर्यंत 4,650 व्हिडिओ लिंक हटवल्या आहेत. चार सदस्यांची विशेष टीम सतत सोशल मीडियावर लक्ष ठेवून असून, नवीन व्हिडिओ अपलोड होताच त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे काही ग्रुपही बंद करण्यात आले आहेत.
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली असून, अहिल्यानगर पोलिसांनी यासंदर्भात सहा जणांना अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. या प्रकरणाच्या तपासात पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.