Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
नाशिकमध्ये गणपती आगमनानिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे मोदक उपलब्ध झाले आहेत. यात २७ हजार रुपये प्रति किलो किमतीचा गोल्डन मोदक लक्ष वेधून घेत आहे. सोन्या-चांदीच्या वर्खात तयार केलेला हा विशेष मोदक गणरायाच्या स्वागतासाठी खास आकर्षण ठरत आहे.
नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी गणेशाचे आगमन होत असल्याने संपूर्ण बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे. नाशिकच्या बाजारपेठेत गणेश चतुर्थीनिमित्त विविध प्रकारचे मोदक दाखल झाले आहेत. यामध्ये केवळ विविध फ्लेवर्सचे मोदकच नव्हे, तर सोन्या-चांदीचे वर्ख असलेले खास मोदकही उपलब्ध आहेत. या मोदकांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक विशेष मोदक आहे, ज्याची किंमत २७ हजार रुपये प्रति किलो आहे.
हा गोल्डन मोदक नाशिकच्या बाजारात उपलब्ध असून, तो मूळ सोन्याच्या आणि चांदीच्या वर्खांनी सजवलेला आहे. हे वर्ख पूर्णतः ओरिजनल असल्याने या मोदकाला एक शाही स्वरूप प्राप्त झाले आहे. गणरायाला प्रिय असलेला मोदक यंदा नाशिकच्या बाजारपेठेत या अद्वितीय स्वरूपात उपलब्ध झाल्याने भाविकांना एक अनोखा पर्याय मिळाला आहे. टीव्ही ९ मराठीसाठी पवन अवगुले यांनी योगेंद्र महाजन यांच्यासह नाशिकमधून हे वृत्त दिले आहे.
