नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द, पर्यावरणप्रेमींच्या मागणीला यश
नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा पर्यावरणप्रेमींच्या मागणीनंतर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.
नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत असलेल्या मागणीनंतर प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार प्रशासनाने ही निविदा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाचे आभार मानत त्यांचे स्वागत केले आहे.
नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून सध्या मोठे आंदोलन उभे राहिले आहे. 2026 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधूंच्या राहुट्या उभारण्यासाठी तपोवनातील शेकडो झाडे हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने सरकारने डॅमेज कंट्रोल म्हणून नाशिक शहरात वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे. सरकारच्या भूमिकेनुसार, तपोवनातून हटवल्या जाणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात नाशिकमध्ये 1000 झाडे लावण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी केलेल्या पुनर्रोपण मोहिमेचा उल्लेख करत, 700-800 झाडे यशस्वीरीत्या रिप्लांट केल्याचा आणि त्यांचा सक्सेस रेशो 60 ते 70% असल्याचे सांगितले. तसेच, 10 वर्षांखालील झाडे हटवण्याची सरकारची भूमिका आहे.
