NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं…

NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं…

| Updated on: Jul 19, 2026 | 2:37 PM

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच, राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चांवर मोठे विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नसल्याचा दावा त्यांनी करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच, राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चांवर मोठे विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नसल्याचा दावा त्यांनी करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. काही नेत्यांकडून दिल्लीत विलिनीकरणासंदर्भात बैठक होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर सुप्रिया सुळे राष्ट्रीय पातळीवरील कामकाज पाहतील, तर सुनेत्रा पवार राज्यातील जबाबदारी सांभाळतील, अशाही चर्चा रंगल्या होत्या.

मात्र, या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आज तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नाहीत. दोन्ही बाजूंच्या अटी आणि शर्ती एकमेकांना मान्य नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होण्याची शक्यता सध्या नाही. त्यांनी असेही म्हटले की, स्वतंत्रपणे इतर पक्षांमध्ये विलीन होण्याची शक्यता असू शकते, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असे चित्र सध्या दिसत नाही. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या पाहणीनंतर बोलताना शिरसाट यांनी रुग्णालयातील विकासकामांवरही नाराजी व्यक्त केली. 14 कोटी रुपयांच्या कामांमध्ये अपेक्षित दर्जा दिसून आला नसल्याचे सांगत, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाची चर्चा डीपीडीसी आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावरही त्यांनी टीका केली. ठाकरे यांच्या आंदोलनाला जनतेचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करत, “आधी स्वतःच्या पक्षाची रक्षा करा,” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून, आगामी काळात या घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 19, 2026 2:37 PM
Follow Us