Priya Marathe Passes Away : अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन, नेमकं कारण काय?
प्रिया मराठे ही ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या शेवटची भेटीला आली होती. आरोग्याचं कारण देत ही मालिकासुद्धा तिने अर्ध्यातून सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती
सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हिंदी आणि मराठी मालिकेतील अभिनेत्री प्रिया मराठे हिच निधन झालं आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज रविवारी सकाळी पहाटे चार वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे हिची कॅन्सर या आजाराशी झुंज सुरू होती. मात्र आज ही झुंज अपयशी ठरली आहे.
‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’ या हिंदी टेलिव्हिजन मालिकांसह ‘तुझेच मी गीत गात आहे’ यासारख्यामराठी मालिकेतून प्रिया मराठे हिने अभिनय केला होता. गणेशोत्सवादरम्यान, उत्साहाचं वातावरण सुरू असताना अचानक अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी येताच मराठी सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रिया मराठे हिने २०१२ साली अभिनेता शंतनू मोघे याच्याशी लग्न केलं होतं. त्यापूर्वी तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर प्रिया मराठेने एन्ट्री घेतली होती. यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘कसम से’ , ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा हिंदी, मराठी मालिकेत ती प्रक्षेकांना बघायला मिळाली होती.
