मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला… पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
मोठी बातमी! तब्बल दोन दशकानंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने पद्मसिंह पाटील आणि अन्य 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
मोठी बातमी! तब्बल दोन दशकानंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने पद्मसिंह पाटील आणि अन्य 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्याअभावी आरोपींना दिलासा देण्यात आला. या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर हे मुंबईवरून धाराशिवकडे निघाले होते. त्यावेळी कळंबोली येथे दोन मारेकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून गोळीबार केला. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींवर भाडोत्री गुंडांमार्फत हत्या घडवल्याचा आरोप होता.
निकाल देताना कोर्टाने स्पष्ट सांगितले की, माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबावर आरोपींना शिक्षा देता येत नाही. यावर कायदेतज्ज्ञ उज्वल निकम म्हणाले की, माफीचा साक्षीदार खरं बोलतोय की खोटं हे तपासण्याची जबाबदारी सरकारी वकिलाची असते. अशा प्रकराच्या खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार खूप महत्त्वाचा असतो सरकारी वकिलाने चकासून काम करणं गरजेचं असतं, मात्र पवनराजे प्रकरणात तसं झाल्याचं दिसत नाही.
