Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला…
शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णिकर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हत्येत वापरलेल्या दोन दुचाकी, एक अल्टो कार आणि पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पप्पू शिंदे, निखिल यादव, नितेश पवार आणि संतोष कनोजियासह अज्ञात व्यक्ती या प्रकरणात संशयित आहेत. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावरही आरोप झाले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथकाने तपास वेगाने सुरू केला आहे. या हत्येमध्ये वापरण्यात आलेली पिस्तूल आणि एक अल्टो कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. आरोपींनी वापरलेल्या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान, पप्पू शिंदे याने पुरवलेली सिल्व्हर रंगाची अल्टो कार (एमएच ०४ डीआर ८२९३) ताब्यात घेण्यात आली आहे. ही कार पप्पू शिंदेने त्याचा मित्र विजय पाटील याच्याकडून गणेशोत्सवाच्या काळात घेतली होती. हत्येनंतर आरोपींनी ही गाडी पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलजवळ पार्क केली होती. गाडीत आरोपींनी तोंडाला बांधलेला रुमालही पोलिसांना सापडला आहे.
या प्रकरणात पप्पू शिंदे, निखिल यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया (टल्ली) आणि एक अज्ञात व्यक्ती अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. नितेश पवारने पोलिसांना गाडीच्या ठिकाणाबद्दल माहिती दिली होती. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा जंगलातून एक मोबाईल आणि पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावरही प्रदीप पूर्णिकर यांच्या मुलाने आरोप केले असून, त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. संतोष कनोजिया आणि अज्ञात हेल्मेटधारी व्यक्ती अद्याप फरार आहेत. पोलीस आता या हत्येमागील मास्टरमाईंडचा शोध घेत आहेत.
