Prakash Mahajan : ‘राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला’, महाजन यांचा क्रांती चौकातून हल्लाबोल
Prakash Mahajan protest : राणेंनी धमकी दिल्याचा आरोप करत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी संभाजीनगरच्या क्रांती चौकातून आज आंदोलन केलं आहे.
आमच्या विरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांना दिल्यानंतर महाजन चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंदोलनाला सुरुवात केली असून नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच मी इथेच तुमची वाट बघतोय, असं म्हणत महाजन यांनी थेट दंड थोपटले आहेत.
प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंनी मला धमकी दिली असल्याचा आरोप करत संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन करण्याचा निर्धार केला. त्यांच्या आंदोलनापूर्वीच महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झाले होते. पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महाजन आंदोलनावर ठाम राहिले. प्रकाश महाजन क्रांती चौकात आंदोलन करण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात केली. मी इथे त्यांची अर्धा तास वाट पाहणार आहे. मला पोलिसांनी अर्ध्या तासाची परवानगी दिली आहे. मी घराचा पत्ता सांगितलेला आहे. त्यांनी त्या घरापाशी यावे आणि त्यांना काय मारहाण करायची ती करावी, असंही यावेळी महाजन म्हणाले.
