Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला

Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला

| Updated on: Sep 04, 2026 | 11:18 AM

पुण्यात डीजेच्या दणदणाटाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावर टीव्ही 9 मराठीच्या शोमध्ये संवाद साधत असताना हल्ला झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विविध राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे.

शरद पवार म्हणाले की, “विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. पण विद्यानंद बापट बोलत आहेत त्याला अर्थ आहे. सण आणि उत्सव हे लोकांना आनंद देणारे असावेत. डीजेच्या आवाजामुळे त्या सणाचं गांभीर्य निघून जातं.” एखाद्या व्यक्तीने आपले मत व्यक्त केले म्हणून त्याच्यावर हल्ला करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“कोणी मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला करणं, हे माझ्या मते लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला आहे,”** असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच या घटनेकडे पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा याआधीच अनेक राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याची मागणी होत असून, हल्ल्यामागील कारणांचा तपास करण्याची मागणीही जोर धरत आहे.

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनीही या घटनेवर भाष्य करत पुण्यातील बदलत्या वातावरणावर चिंता व्यक्त केली. “पुणे ही चांगुलपणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते. मात्र दुर्दैवाने काही प्रवृत्तींमुळे हे शहर वाईटपणाचीही प्रयोगशाळा बनत असल्याचं चित्र दिसत आहे. समाजातील काही कट्टरवादी प्रवृत्ती वाढत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

डीजेचा आवाज, गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण आणि त्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीवर झालेला हल्ला यामुळे पुण्यातील वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लोकशाही पद्धतीने मत मांडण्याच्या अधिकाराचा मुद्दा या घटनेमुळे ऐरणीवर आला असून, या प्रकरणात पुढे पोलिसांकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

Published on: Sep 04, 2026 11:18 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us