राहुल गांधींना भिवंडी कोर्टात जामीन, मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे

राहुल गांधींना भिवंडी कोर्टात जामीन, मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे

| Updated on: Feb 22, 2026 | 11:14 AM

राहुल गांधींना भिवंडी कोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र, कोर्टात हजर राहण्यासाठी जात असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. २०१४ मध्ये राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्यावरून हा खटला सुरू आहे. पुढील सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज भिवंडी न्यायालयाने जामीन मंजूर केला. एका जुन्या मानहानीच्या प्रकरणात ते कोर्टात हजर राहिले होते. तथापि, मुंबई आणि ठाण्यातून भिवंडीकडे जात असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आनंदनगर चेकनाक्याजवळ त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. ‘आरएसएस’बाबत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील राहुल गांधींच्या वक्तव्यावरून हा खटला सुरू आहे.

राहुल गांधींनी ‘महात्मा गांधींच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचा’ आरोप केला होता. या प्रकरणी ‘आरएसएस’चे पदाधिकारी राजेश कुटे यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. राहुल गांधी हे जामिनावर होते, परंतु त्यांचे जामीनदार शिवराज पाटील चाकूरकर यांचे डिसेंबर 2025 मध्ये निधन झाल्याने, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नवीन जामीनदार झाले आहेत. भिवंडी न्यायालयाने हे जामीनपत्र मंजूर केले. भाजपच्या मते, राहुल गांधींनी माफी मागितलेली नाही, त्यामुळे कायद्यानुसार कार्यवाही व्हावी. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे.

Published on: Feb 22, 2026 11:13 AM