Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

| Updated on: Sep 18, 2026 | 2:36 PM

महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विविध आंदोलनांवर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांचे यावर विशेष लक्ष असून, दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच, मराठा आरक्षण आणि इतर समाजांच्या आंदोलनांवर सकारात्मक चर्चा करून कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना गणरायाकडे केलेली प्रार्थना आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य केले. “गणरायाच्या चरणी माझ्यासारखा प्रत्येक गणेशभक्त हेच आवाहन करतो की, देशातील प्रत्येक नागरिकाला चांगले आरोग्य मिळावे. हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे,” असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बळीराजा चिंतेत असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. वातावरणातील बदलामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण परिस्थितीकडे विशेष लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

“पाच ऑक्टोबरनंतर सर्वे वगैरे केल्यानंतर दुष्काळ जाहीर करावा लागतो. या परिस्थितीत सरकार ठामपणे 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे,” असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीवर तात्पुरत्या उपायांसोबतच कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या पाण्यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते, तर सध्या काही भागांमध्ये सुक्या दुष्काळाची स्थिती असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले असते तर मराठवाडा ग्रीडसह शेतकरी आणि सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अनेक प्रकल्प पुढे गेले असते, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. कोल्हापुरातील पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवरही मार्ग निघाला असता, असा दावाही त्यांनी केला.

Published on: Sep 18, 2026 2:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us