रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी व्हीएसआर कंपनीच्या विमानात कधीही प्रवास केला नसल्याचा दावा केला होता. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या अपघातापूर्वी रोहित पवार यांनी त्याच व्हीएसआर विमानातून अजित पवारांसोबत दिल्ली ते नागपूर प्रवास केल्याचे उघड झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून कधीही प्रवास केला नसल्याचा दावा जाहीरपणे केला होता. मात्र, आता समोर आलेल्या माहितीमुळे त्यांच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका पत्रकार परिषदेत सादर केलेल्या पुराव्यानुसार, अजित पवारांचा विमान अपघात होण्यापूर्वी, १० डिसेंबर २०२५ रोजी रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत दिल्ली ते नागपूर असा विमान प्रवास केला होता.
धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रवास अपघातग्रस्त झालेल्या त्याच व्हीएसआर कंपनीच्या विमानातून आणि त्याच पायलट (सुमित कपूर) व सह-पायलट (कॅप्टन शांभवी) यांच्यासोबत झाला होता. या पुराव्यामुळे रोहित पवारांना प्रश्न विचारण्यात आले आहेत की, त्यांनी व्हीएसआर विमानात प्रवास केला नसल्याचा दावा का केला? तसेच, अजित पवारांसोबत त्यांनी हा प्रवास नेमका कोणत्या कारणासाठी केला होता? सुमारे दीड महिन्यांपूर्वी झालेल्या या प्रवासाचा तपशील समोर आल्याने, व्हीएसआर विमान अपघात प्रकरणातील चर्चेला नवीन वळण मिळाले आहे.
