Sanjay Raut UNCUT | सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे… कारण ते… संजय राऊत असं का म्हणाले? काय आहे वाद?
महाराणी ताराराणी यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
महाराणी ताराराणी यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वतःला मराठी किंवा मराठा समजतात, पण त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराराणी यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला. तरीही त्यांनी साधा निषेधही व्यक्त केला नाही.” धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा आणला आहे, पण तुम्ही आमच्या ताराराणींचे जबरदस्तीने धर्मांतर करत आहात. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे.” तसेच त्यांनी सवाल उपस्थित करत विचारले की, “सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी असलेल्या झुंजार वीरांगना ताराराणी यांचे धर्मांतर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? यामागे नेमके काय षडयंत्र आहे?” राऊत यांनी पुढे टीका करत म्हटले की, “आमचे राजे, महाराजे आणि महाराणी यांना परस्पर जैन ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही विचारधारा किती विकृत पातळीवर गेली आहे, हे यातून दिसते. मराठा संघटना आणि मराठी अस्मितेचे पुरस्कर्ते आता कुठे आहेत?” ताराराणींबाबत अशा प्रकारचे वक्तव्य केवळ निषेधापुरते मर्यादित न ठेवता ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते त्या ठिकाणी उपस्थित होते, पण त्यांनी साधा शब्दही उच्चारला नाही. कदाचित त्यांना ताराराणी माहित नसतील; त्यांनी ‘ताराबेन’ असे ऐकले असेल. मात्र त्या ताराराणी आहेत, हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत,” असे राऊत म्हणाले. शेवटी, “शूरवीर आणि राष्ट्रसंरक्षक हे महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आहेत,” असे सांगत राऊत यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
