Sarangi Mahajan : या बहिणीला आता मजबूत खांदा हवाय म्हणून त्याच्यासोबत साटंलोटं, मुंडे बंधू-भगिनींची कुणी काढली लायकी?
गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदारावरून बीडमध्ये नवा वाद उफाळला आहे. यातच राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रिया येत असून रोज नवनवे दावे केले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसावरून सुरू असलेला वाद आता आणखीनच चिघळला आहे. सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा पुढे न्यावा, असे विधान केले. यावर तात्काळ प्रतिक्रिया म्हणून, पंकजा मुंडेंचे मामा आणि माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे याच त्यांच्या वडिलांच्या राजकीय वारसदार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, सारंगी महाजन यांनी मुंडे बंधू-भगिनी गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आरोप केला की, या बहिण-भावाने लोकशाही राजकारण सोडून हुकूमशाही राजकारण सुरू केले आहे.
तसेच, सारंगी महाजन यांनी त्यांची जमीन हडप केल्याचा आरोपही मुंडे बंधू-भगिनींवर केला. बीडच्या जनतेने पाठ फिरवल्यास त्यांना दहा हजार मतेही मिळणार नाहीत, असे सारंगी महाजन यांनी म्हटले. याउलट, पंकजा मुंडेंनी संजय राठोड आणि अर्जुन खोतकर यांना गोपीनाथ मुंडेंचे वारसदार असल्याचे सांगितले आहे. तसेच, मुंडे साहेबांचे खरे वारसदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
