Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही…; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा
सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघात शासनाच्या हस्तक्षेपामुळे सभासदांचा कौल तुडवला जात असल्याचा आरोप केला आहे. अध्यादेशाच्या आडून शासकीय सदस्य नेमून कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविरोधात ९ नोव्हेंबर रोजी दसरा चौकात कोल्हापूर संघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
गोकुळ दूध संघाच्या कारभारात राज्य सरकार अध्यादेशाच्या आडून हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला आहे. चार शासकीय सदस्यांच्या निवडीवरून पाटील यांनी संतप्त सवाल उपस्थित केला असून, हा गोकुळच्या सभासदांच्या कौलाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, “तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकू शकला नाहीत, मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसे घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता?” या कृतीला त्यांनी “कौलावर सरकारी दरोडा” आणि “कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान” असे संबोधले आहे. “घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही आणि अहंकाराची मस्ती उतरवतो, असे सांगत सतेज पाटील यांनी तीव्र शब्दांत शासनाला आव्हान दिले आहे. या सरकारी हस्तक्षेप विरोधात ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथे कोल्हापूर संघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
