Babajani Durrani : शरद पवारांना मोठा धक्का, विश्वासू माणसानं सोडली साथ अन् काँग्रेसचा धरला हात
2004 मध्ये पहिल्यांदा बाबाजानी दुर्राणी विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं होतं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत गेले होते.
गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे प्रमाण वाढले असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या विश्वासू आणि जवळच्या माणसाने त्यांची साथ सोडल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. त्यामुळे परभणीत शरद पवारांची चिंता वाढली असल्याची चर्चा होते. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज सकाळी 11 वाजता मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस कार्यालयात हा पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि बाबाजानी दुर्राणी यांनी काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं असताना बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसचा हात हातात घेतलाय.
