वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट…
बीडमधील वाल्मिक कराडचा साथीदार सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी समोर आली आहे. टोल न भरल्याच्या वादातून त्याने मसा जोगच्या एका तरुणाला धमकावले आणि हल्ला केला. काही दिवसांपूर्वीच सुग्रीव आणि वाल्मिक कराड यांच्यातील एका कॉल रेकॉर्डिंगमधून खासदार सोनावणे यांच्या मुलाला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कटाचा खुलासा झाला होता.
बीड जिल्ह्यातील उमरी टोल नाक्यावर वाल्मिक कराडचा साथीदार सुग्रीव कराड याच्या गुंडगिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. टोल न भरल्याच्या क्षुल्लक वादातून सुग्रीव कराडने मसा जोग येथील देशमुख नामक तरुणाला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सुग्रीव कराड तरुणाशी अरेरावी करताना आणि त्याला शिवीगाळ करताना स्पष्ट दिसत आहे. “एक तासापर्यंत फुंकून देईन मी तुला. माणसासहित,” अशा धमक्या त्याने दिल्या आहेत.
ही घटना जुनी असली तरी, आता हा व्हिडिओ समोर आल्याने कराड टोळीच्या दहशतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यात झालेली एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, ज्यात खासदार सोनावणे यांच्या मुलाला खुनाच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप खासदार सोनावणे यांनी केला होता. वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी, त्याचे साथीदार बाहेर सक्रिय राहून अशा घटना घडवत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे.
