विखे-लंकेमध्ये जुंपली! अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामाचा वाद पेटला
अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सुजय विखे पाटील आणि निलेश लंकेंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. खासदार सुजय विखे पाटील यांनी कामातील अडथळे स्पष्ट करत स्वतःच्या कार्यकाळात कामाला सुरुवात झाल्याचे सांगितले. पुढील १०-१२ दिवसांत राहुरी शहरातील डांबरीकरण पूर्ण होईल आणि पाऊस थांबल्यावर उर्वरित काम वेगाने होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून अहिल्यानगरचे आजी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि निलेश लंकेंमध्ये सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात या मार्गाच्या कामात झालेल्या प्रगतीवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, खासदार झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला.
कामातील पहिल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आले, तर दुसऱ्या ठेकेदाराच्या तांत्रिक कारणामुळे करार रद्द झाला. त्यानंतर तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्यात आले. सध्या बऱ्यापैकी काम सुरू असून, राहुरी शहर ते राहुरी फॅक्टरीपर्यंतच्या भागाचे डांबरीकरण पुढील १०-१२ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. पाऊस थांबल्यानंतर उर्वरित काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले. रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणींवर मदत करण्याची तयारीही विखे पाटील यांनी दर्शवली.
