Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
ठाणे स्थानक पश्चिम येथे महाराष्ट्रातील पहिला प्रीपेड रिक्षा स्टँड सुरू झाला आहे. भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील भाड्यावरून होणारे वाद, रांगेची समस्या आणि सुट्या पैशांची अडचण दूर होणार आहे. प्रवाशांना निश्चित भाडे आणि चालकांना योग्य कमाई मिळणार आहे.
ठाणे स्थानक पश्चिम येथे महाराष्ट्रातील पहिल्या प्रीपेड रिक्षा स्टँडचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली. अनेक वर्षांपासून रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये भाड्यावरून, सुट्या पैशांवरून तसेच रांगेवरून होणारे वाद यामुळे थांबण्यास मदत होणार आहे.
हा प्रीपेड स्टँड प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. प्रवाशाला ठाण्यात किंवा ठाण्याबाहेर (परमिट असलेल्या ठिकाणी) कुठेही जायचे असल्यास, येथील काउंटरवर डेस्टिनेशन सांगितले जाईल. त्यानंतर सिस्टमद्वारे भाडे निश्चित करून पावती दिली जाईल. यामुळे प्रवाशांना निश्चित भाडे देऊन थेट रिक्षात बसता येणार आहे, तर चालकांनाही भाड्यासाठी वाद घालण्याची गरज राहणार नाही.
या प्रणालीमुळे रिक्षाचालकांना मीटरनुसार योग्य भाडे मिळेल, तसेच प्रवाशांना भाडे नाकारले जाण्याची शक्यताही कमी होईल. ठाणे शहरात वाहतूक व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.
