Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Aug 08, 2026 | 2:00 PM

शिवसेना कोणाची, यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे गटातील खासदारांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, न्यायालयीन सुनावणी सुरू असताना अशा प्रकारच्या भेटीमुळे न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेना कोणाची, यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे गटातील खासदारांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, न्यायालयीन सुनावणी सुरू असताना अशा प्रकारच्या भेटीमुळे न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीर खासदारांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही या भेटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांची मोदींसोबत झालेली भेट नेमक्या कोणत्या राजकीय संदेशाचा भाग आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

“एकनाथ शिंदे आधी अमित शाह यांना भेटायचे. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत आहेत. अमित शाह मुंबईत असताना ते पंतप्रधान मोदींना भेटत आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी मोदींच्या “भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे” या भूमिकेवरून थेट सवाल उपस्थित केला. हा संदेश नेमका अमित शाहांना, न्यायालयाला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या पक्षावर आणि आमदार-खासदारांच्या पात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू असताना झालेल्या या भेटीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी न्यायालयानेही या संपूर्ण घडामोडीची दखल घ्यावी, असे म्हटले. “कोर्टाला ही पेपरची कात्रण द्या. वातावरण कसं निर्माण केलं जात आहे, हे सांगा,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्याला केवळ शिवसेनेपुरते मर्यादित न ठेवता देशातील लोकशाहीशी जोडले. “ही लढाई शिवसेनेपुरती नसून गद्दारीचा हा व्हायरस देशभर पसरतोय,” अशी टीका त्यांनी केली. इतर पक्षांमधील नेत्यांनाही भाजपकडून अशाच प्रकारचा संदेश दिला जात आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी “आमच्याकडे या, तुमच्या केसालाही हात लागणार नाही, मी तुमच्या पाठीशी आहे,” असा टोला लगावला.

“पंतप्रधान मोदींची धमकी नेमकी कुणाला? अमित शाहांना, फडणवीसांना की कोर्टाला?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पुन्हा उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशातील जनतेला आणि विशेषतः तरुणांना लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. देशात “गद्दारीचा व्हायरस” पसरत असल्याचा आरोप करत त्यांनी सर्वांनी लोकशाहीसाठी लढले पाहिजे, असे म्हटले. देशातील तरुणांमध्ये संताप असून, कितीही प्रयत्न केले तरी तरुण आता ऐकायला तयार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरे गटाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि उद्धव ठाकरे यांनी न्यायालयावर दबाव आणण्याचा आरोप केल्याने शिवसेना कोणाची या वादाला पुन्हा राजकीय धार मिळाली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 08, 2026 1:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us