MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीवर भर देण्यात आला. मात्र, 59 पैकी केवळ 35 आमदार उपस्थित राहिल्याने बैठकीची विशेष चर्चा रंगली.

बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसमोर दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. “महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असे म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? आणि आपण जनतेसमोर एकत्रितपणे मुद्दे मांडतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत आगामी काळात अधिक समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी बोलताना ठाकरे यांनी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विरोधकांची एकी स्पष्टपणे दिसली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच राज्यभर आयोजित होणाऱ्या सभा, बैठका आणि आंदोलनांमध्येही महाविकास आघाडीने एकत्रितपणे सहभागी व्हावे आणि जनतेसमोर एकसंघ चेहरा सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी या बैठकीत त्या पक्षफुटीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मोठ्या संख्येने आमदारांची अनुपस्थिती. महाविकास आघाडीच्या 59 आमदारांपैकी 24 आमदार बैठकीला गैरहजर राहिले. अनुपस्थित राहिलेल्यांमध्ये काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जयंत पाटील, रोहित पवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, अभिजीत पाटील, विकास ठाकरे, संदीप क्षीरसागर यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
या बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांच्या एकजुटीचा संदेश देण्यासाठी आयोजित बैठकीतच अनेक आमदार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आगामी काळात या घडामोडींवर संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.