NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. आमदार विक्रम काकडे यांनी प्रथम शरद पवारांची भेट घेतली, जिथे विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर काकडेंनी शरद पवारांचा निरोप घेऊन सुनेत्रा पवारांची भेट घेतली. लवकरच ते पुन्हा पवारांना भेटण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी नुकतीच शरद पवार आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम काकडे यांनी पुण्यात शरद पवारांच्या निवासस्थानी मोदीबाग येथे सुमारे अर्धा तास भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीतील मदतीसंदर्भात ही भेट असल्याचे काकडे यांनी माध्यमांना सांगितले असले तरी, सूत्रांनुसार या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शरद पवारांनी काकडेंकडे एक निरोप दिल्याचेही म्हटले जात आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर लगेचच विक्रम काकडे यांनी सुनेत्रा पवारांची त्यांच्या जिजाई निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांनी दिलेला निरोप काकडेंनी सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचवला आणि त्यांच्यातही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी काळात विक्रम काकडे पुन्हा शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असून, या भेटींमुळे राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.
