काँग्रेस नेत्यांनी 'ही' भीती घातल्यामुळे सोनिया गांधी पाठिंब्यास राजी

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी समजूत घातल्यानंतर सोनिया गांधींनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पाठिंबा देण्यास मान हलवल्याचं वृत्त आहे.

काँग्रेस नेत्यांनी 'ही' भीती घातल्यामुळे सोनिया गांधी पाठिंब्यास राजी

नवी दिल्ली : सत्तेत गेलो नाही, तर महाराष्ट्रात काँग्रेस बेचिराख होईल, अशी भीती पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी हायकमांड सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली होती. त्यानंतरच सोनियांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला पाठिंबा देण्यास मान हलवल्याचं वृत्त (Maharashtra Congress to Sonia Gandhi) आहे.

भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्याचा सूर आळवला होता. मात्र परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षाशी हातमिळवणी करणं इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये अंगलट येईल आणि इभ्रत धुळीला मिळेल, अशी भीती गांधी कुटुंबाला सतावत होती.

पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादीचा, 5 वर्ष काँग्रेसचा उपमुख्यमंत्री?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या तिघा माजी मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींची समजूत काढली. सत्तेत सहभागी होण्याची संधी गमावली, तर महाराष्ट्रातून काँग्रेसचं नामोनिशाण नष्ट होईल, ही भीती त्यांनी बोलून दाखवली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकारिणीतील नेते एके अँटनी, मुकुल वासनिक, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. ठाकरे कुटुंबाचा हिंदुत्वावादाचा मुद्दा काँग्रेसच्या विचारधारेशी मिळताजुळता नसल्याचं त्यांनी सांगितलं.

कर्नाटकमध्ये जेडीएससोबत हातमिळवणी केल्यानंतर आलेल्या अपयशाकडे के सी वेणुगोपाल यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास राजी (Maharashtra Congress to Sonia Gandhi) नव्हत्या.

महाराष्ट्रातून निवडून आलेल्या 44 आमदारांना राजस्थानात सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. मात्र हा मुक्काम संपवून सर्वजण आता जयपूरहून मुंबईला येणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *