सुरेश धस 'कटप्पा', तर भीमराव धोंडे 'सेतुपती', बीडच्या वर्तमानपत्रात जाहिरातींचा 'बाहुबली'

विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे पराभवानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बीडमधील आरोप-प्रत्यारोपांना थेट फिल्मी स्वरुप (Poliical Bahubali in Beed) आलं आहे.

सुरेश धस 'कटप्पा', तर भीमराव धोंडे 'सेतुपती', बीडच्या वर्तमानपत्रात जाहिरातींचा 'बाहुबली'

बीड: विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे पराभवानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. बीडमधील आरोप-प्रत्यारोपांना थेट फिल्मी स्वरुप (Poliical Bahubali in Beed) आलं आहे. बीडमधील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या समर्थकांनी आमदार सुरेश धस (Dispute in Bheemrao Dhonde and Suresh Dhas) यांना कटप्पाची उपमा दिले आहे. तर दुसरीकडे धस यांच्या समर्थकांनी धोंडे यांना सेतुपतीचा उपमा दिली. दोन्हीकडील समर्थक एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी याच्या बीडमधील वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीही दिल्या. त्यामुळे बीडकरांना या जाहिरातींच्या माध्यमातून राजकीय ‘बाहुबली’चं दर्शन घडत आहे.

विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांचा पराभव झाल्यानंतर धोंडे समर्थकांकडून भाजप आमदार सुरेश धस यांना कटप्पा हे विशेषण देण्यात आलं. तसेच अनेक स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता आमदार सुरेश धस समर्थकांनी पराभूत उमेदवार भीमराव धोंडे यांना ‘सेतुपती’चे विशेषण लावत स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिराती दिल्या. त्यामुळे बीडमध्ये सध्या वर्तमानपत्रातून बीडच्या राजकीय ‘बाहुबली’ चित्रपटाचे दर्शन होत आहे. तसंच भाजपच्या या आजी-माजी आमदाराचं बीड रुपी ‘माहिष्मती’ साम्राज्यावरून राजकीय युद्ध पेटल्याचंही बोललं जात आहे.

भीमराव धोंडे यांना भाजपकडून बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. याच मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना तब्बल 65 हजारांचं लीड मिळालं होतं. या अनुषंगाने मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा विजय होईल असं मानलं जात होतं. मात्र, असं असतानाही धोंडे तब्बल 25 हजार मतांनी अनपेक्षितपणे पराभूत झाले. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे विजयी झाले.

धोंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर धोंडे समर्थकांकडून सुरेश धस यांना कटप्पा पदवी देण्यात आली. “कटप्पाने बाहुबली को क्यू मारा” या आशयाच्या जाहिराती देखील स्थानिक वर्तमानपत्रातून प्रकाशित करण्यात आल्या. याची जिल्ह्यासह राज्यात चर्चा सुरू आहे. या घटनेला 4 दिवस झाले असताना आता पुन्हा हा वाद पेटला आहे. जर मी कटप्पा असेल, तर कटप्पा हे पात्र इमानदार नोकराचं आहे. तुम्ही स्वतःला बाहुबली म्हणता पण तुम्ही बाहुबली होऊ शकत नाही. मी कटप्पा असेल, तर तुम्ही काय सेतुपती आहात का? असा सवाल करत आमदार सुरेश धस यांनी पराभूत उमेदवार भीमराव धोंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कटप्पा बाहुबलीवरून सुरू झालेलं हे शीतयुद्ध एवढ्यावरच थांबलं नाही. धोंडे समर्थकांकडून जाहिराती प्रकाशित केल्यानंतर आता धस समर्थकांनी सेतुपतीचं डोकं छाटलेला फोटो जाहिरात म्हणून विविध वर्तमानपत्रात प्रकाशित केला आहे. सेतुपतीचा शिरच्छेद कशामुळे केला हे चित्रपट बघणाऱ्यांना सर्वांनाच माहित आहे. मग सुरेश धस समर्थकांना यातून नेमकं काय सुचवायचं असेल याविषयी अनेक अंदाज लावले जात आहेत. मात्र, अशा अनपेक्षित राजकीय वादाचं सूडबुद्धीनं सुरू झालेलं राजकारण योग्य नसल्याची प्रतिक्रिया बीडमधील राजकीय विश्लेषक देत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *