सामना वाचाल तर वाचाल, मुख्यमंत्रीपद हवंच : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Sanjay Raut on Devendra Fadnavis) यांना सामना वाचत नसल्याच्या वक्तव्यावरुन टोला लगावला आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis, सामना वाचाल तर वाचाल, मुख्यमंत्रीपद हवंच : संजय राऊत

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Sanjay Raut on Devendra Fadnavis) यांना सामना वाचत नसल्याच्या वक्तव्यावरुन टोला लगावला आहे. सामना वाचाल तरच वाचाल असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना (Sanjay Raut on Devendra Fadnavis) सामना वाचण्याचा सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत युती करताना जे ठरलं आहे त्याप्रमाणे आम्हाला मुख्यमंत्रीपद हवंच. जे ठरलं आहे ते द्या, जे ठरलं नाही ते देऊ नका, असंही राऊत यांनी ठामपणे सांगितलं.

सामना वाचावाच लागतो. काही मोठेपणाने वाचतात. सामना हे देशातील असं वर्तमानपत्र ज्याची दखल घ्यावी लागते. त्यामुळे सामना वाचाल तरच वाचाल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

‘ट्रम्प आणि पुतीनही सामनावर नाराज’

मुख्यमंत्र्यांच्या सामनातील लिखाणावर नाराजीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “अधूनमधून ट्रम्प आणि पुतीन देखील नाराजी व्यक्त करत असतात. ट्रम्प यांच्याकडे देखील सामना जातो. आम्ही सामनात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय हितासंबंधित ज्या भूमिका घेतो त्याविषयी ट्रम्प यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे तसं कळवलं आहे. पुतीन देखील खूप खवळले आहेत. जर सामनातून हे लिखाण थांबलं नाही तर भारताला आम्ही जी मदत करतो ती करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचं आमच्या कानावर आलं आहे.”

‘लोकसभा आणि विधानसभेत काही ठरल्याशिवाय युती झाली का?’

ठरल्याप्रमाणे आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे. आम्ही कुणाचंही हिसकावून घेत नाही. जे ठरलं आहे ते द्या. जे नाही ठरलं ते देऊ नका, असंही राऊत यांनी नमूद केलं. ते म्हणाले, “आजची बैठक रद्द झाली आहे. त्यामागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीआधी दोन्ही पक्षांनी 50-50 फॉर्म्युला अधिकृतपणे ठरवला. त्यामुळे चर्चा करण्याआधी त्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे. आता मुख्यमंत्री म्हणतात की असं काही ठरलेलंच नव्हतं. मग नक्की काय ठरलं होतं आणि असं काय ठरलं ज्यामुळे लोकसभेत युती झाली, विधानसभेत युती झाली? काहीतरी ठरल्याशिवाय युती झाली का? ते म्हणतात काही ठरलंच नव्हतं.”

“भाजपचे 75 आमदार शिवसेनेच्या संपर्कात”

भाजप पुरस्कृत खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “संजय काकडे यांनी काकडे भाजपचे आहेत का हे पाहायला हवे आणि ते पुन्हा खासदार होणार आहेत का हेही पाहायला हवे असं उत्तर दिलं. त्यांना अधिकृतपणे हे सर्व सांगण्यासाठी नेमलं आहे का? भाजपचे 75 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं मी म्हटलं तर त्याला काही एक महत्त्व आहे. कारण मी शिवसेनेचा नेता आणि प्रवक्ता आहे. माझ्या बोलण्याला काही एक वजन आहे. माझं बोलणं कुणी नाकारणार नाही. त्यामुळे असे हवेतले बाण खूप सुटतात. अशा अफवांना ताकद देऊ नये.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *