'आदित्यजी, जे मिळवायचं आहे, ते आताच', मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस नेत्याचा सल्ला

'जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका.' असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरेंना अडीच-अडीच वर्षाची मुख्यमंत्रिपदाची भागीदारी झाल्यास, सुरुवातीलाच मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काबीज करण्यास सुचवलं आहे.

Satyajeet Tambe suggests Aditya Thackeray, ‘आदित्यजी, जे मिळवायचं आहे, ते आताच’, मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस नेत्याचा सल्ला

मुंबई : राजकारणात पक्षाच्या पलिकडेही मैत्रीचे बंध पाहायला मिळतात. विधीमंडळाची पायरी चढणारे पहिले ठाकरे अर्थात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राजकारणात नवखे नसले, तरी महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपल्या अनुभवातून त्यांना मित्रत्वाचा सल्ला (Satyajeet Tambe suggests Aditya Thackeray) दिला आहे. ‘जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका.’ अशा शब्दात तांबेंनी अडीच-अडीच वर्षाची मुख्यमंत्रिपदाची भागीदारी झाल्यास, सुरुवातीलाच मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काबीज करण्यास सुचवलं आहे.

सत्यजीत तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आदित्य ठाकरे यांना सल्ला दिला आहे. ‘2007 मध्ये 24 व्या वर्षी अहमदनगरमधून मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले. मी सुरुवातीचं सव्वा वर्ष मागूनही दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्षपद दिले गेले. सव्वा वर्षांनी त्यांनी राजीनामा न दिल्यामुळे मी ताटकळत राहिलो, असा अनुभव तांबेंनी (Satyajeet Tambe suggests Aditya Thackeray) सांगितला आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट?

2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी ‘अध्यक्ष’ व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.

मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, ‘सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल’. पुढे सर्व जिल्हा मला ‘भावी अध्यक्ष’ म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या.

पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला.

हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती. – सत्यजित तांबे, महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष (Satyajeet Tambe suggests Aditya Thackeray)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *