अर्जुन खोतकरांच्या नशिबी सलग विजय नाहीच, एक आड एक पराभव कायम

एक आड एक पराभव होणाऱ्या अर्जुन खोतकर यांचा 16 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे.

अर्जुन खोतकरांच्या नशिबी सलग विजय नाहीच, एक आड एक पराभव कायम

जालना : पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री आणि जालना विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर (Shivsena Arjun Khotkar Jalna) यांच्या नशिबी सलग विजय नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. खोतकर यांना काँग्रेसमधील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे एक आड एक विधानसभेला पराभूत होण्याची खोतकरांची परंपरा कायम राहिली आहे.

अर्जुन खोतकर यांचा 16 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे. 1990 पासून सलग सातव्यांदा खोतकर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र 1995 मध्ये दुसऱ्यांदा आमदारकी मिळवल्यानंतर एक आड एक विधानसभा निवडणुकांमध्येच ते जिंकत आले आहेत.

1990 – विजय
1995 – विजय
1999 – पराभव
2004 – विजय
2009 – पराभव
2014 – विजय
2019 – पराभव

अर्जुन खोतकर यांची कारकीर्द

अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. सुरुवातीपासूनच शिवसेनेत सक्रीय. 1990 मध्ये अर्जुन खोतकर हे वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले. 1995 ते 1999 या काळात ते दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले. 1997 ते 1999 या काळात पाणीपुरवठा, पर्यटन, माहिती जनसंपर्क खात्याचं मंत्रिपद आणि उस्मानाबादचं पालकमंत्रिपद त्यांनी सांभाळलं.

1999 मध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे 2004 पर्यंत ते विधीमंडळाबाहेर राहिले. 2004 मध्ये खोतकर तिसऱ्यांदा आमदार झाले. मात्र घनसावंगी मतदारसंघात 2009 मध्ये त्यांचा पराजय झाला. 2014 मध्ये चौथ्यांदा आमदार होऊन ते पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री झाले. नांदेड आणि उस्मानाबादचं पालकमंत्रिपदही त्यांनी भूषवलं.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, मराठवाड्यातील नामांकित कृषी उत्पन्न बाजार समितीवर सतत 15 वर्ष चेअरमन अशी विविध पदं त्यांनी भूषवली. जालना विधानसभा मतदारसंघात जालना शहरातील मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात.

साधारणपणे 1999 पासूनचा इतिहास पाहिला तर युतीच्या काळात राज्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या अर्जुन खोतकर (Shivsena Arjun Khotkar Jalna) यांचा काँग्रेसमधील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला होता. 2004 मध्ये पुन्हा मतदारांनी खोतकरांना संधी दिली, तर 2009 मध्ये पुन्हा गोरंट्याल यांना. 2014 मध्ये पुन्हा खोतकर केवळ 296 मतांनी विजयी झाले.

यावेळेला आपण 25 हजारांनी निवडून येणार असल्याचा विश्वास खोतकरांनी व्यक्त केला होता, परंतु 16 हजारांच्या मताधिक्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये बरीच तणातणी झाली होती. शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी एकमेकांवर जबरदस्त टीका केली होती. तसेच अर्जुन खोतकर यांनी जालन्याच्या जागेवर दावा केला होता. तसेच दानवेंना जालन्यात आस्मान दाखवू अशी टीकाही अर्जुन खोतकरांनी केली होती. मात्र युती झाल्यानंतर ही जागा भाजपला देण्यात आली आणि खोतकरांनीही सौहार्दाची भूमिका घेतली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *