शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत यांची अखेर हकालपट्टी

वांद्रे पूर्व मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगत बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं आहे.

शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत यांची अखेर हकालपट्टी

मुंबई : ‘मातोश्री’च्या अंगणातच बंडाचं निशाण फडकवणाऱ्या तृप्ती सावंत यांना अखेर शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तृप्ती सावंत यांची हकालपट्टी (Shivsena Rebel Trupti Sawant expel)  केल्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगत तृप्ती सावंत यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. तिकीट डावलल्यामुळे आमदारपदी असलेल्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी मागे घेण्याची विनंती खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतरही तृप्ती सावंत यांचं बंड शमलं नव्हतं.

शिवसेनेने याआधी दहा बंडखोरांना पक्षातून हाकलले आहे. त्यावेळी तृप्ती सावंत आणि राजुल पटेल यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे बंडखोरांबाबत सेना दुजाभाव करत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. राजुल पटेल यांच्याबाबत अद्यापही शिवसेनेने कोणतीही कारवाई केल्याचं दिसत नाही.

तृप्ती सावंत यांच्या जागी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंड पुकारणाऱ्या तृप्ती सावंत यांना ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेऊन का होईना, बाहेर काढल्याचं (Shivsena Rebel Trupti Sawant expel) दिसत आहे.

दुसरीकडे, मित्रपक्ष भाजपच्या भारती लव्हेकरांविरोधात बंडखोरी करणाऱ्या राजुल पटेल यांच्याविषयी सेना ‘और थोडे आस्ते कदम’ घेताना दिसत आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघाची पार्श्वभूमी

2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना हरवून जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

यंदाच्या तिकीटवाटपावेळी शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ‘वांद्रे पूर्व’ मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. अखेर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं.

राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले होते. बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम

वांद्रे (पूर्व) – विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) विरुद्ध झिशान सिद्दीकी (काँग्रेस) विरुद्ध तृप्ती सावंत (शिवसेना बंडखोर)
वर्सोवा – भारती लवेकर (शिवसंग्राम-भाजप) विरुद्ध बलदेव खोसा (काँग्रेस) विरुद्ध राजुल पटेल (शिवसेना बंडखोर)

भाजपने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर शिवसेनेतही कारवाईची सूत्रं हलली होती. उस्मानाबाद आणि सोलापुरातील प्रत्येकी दोन, तर माढ्यातील एका बंडखोराची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *