नवीन कार खरेदीचा प्लॅन आहे? लोन फायनल करण्यापूर्वी ‘या’ 10 गोष्टी नक्की तपासा
आजकाल हक्काची कार खरेदी करणे सोपे झाले असले तरी त्यासाठी योग्य कार लोन निवडणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा ग्राहक केवळ मासिक हप्ता (EMI) पाहून कर्ज फायनल करतात. मात्र, बँकेचे व्याजदर, प्रोसेसिंग फी आणि अटी नीट न तपासल्यास भविष्यात मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.

कार लोन घेताना घाईगडबड न करता विविध बँकांच्या ऑफर्सची तुलना करणे गरजेचे आहे. कर्जाचा कालावधी, घटणारे व्याजदर, प्री-पेमेंट पेनल्टी आणि सिबिल स्कोअर यांसारख्या अनेक तांत्रिक बाबींवर कर्जाचा एकूण खर्च अवलंबून असतो. फसवणूक टाळण्यासाठी आणि खिशाला परवडणारे कर्ज निवडण्यासाठी 10 कलमी चेकलिस्ट तपासून पाहणे फायदेशीर ठरेल. कार लोन घेताना होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आणि खिशाला परवडणारे कर्ज निवडण्यासाठी लोन अर्ज करण्यापूर्वी पुढील 10गोष्टी आवर्जून तपासल्या पाहिजेत.
व्याजदराचा प्रकार
बँका फिक्स्ड (स्थिर) आणि फ्लोटिंग (बदलणारे) अशा दोन प्रकारे व्याज आकारतात. फ्लोटिंग दरांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार व्याजदर बदलत राहतात. त्यामुळे कर्ज घेताना तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य ठरेल, हे तपासून घ्या.
प्रोसेसिंग फी आणि हिडन चार्जेस
लोन मंजूर करताना बँका काही टक्के प्रोसेसिंग फी आकारतात. अनेकदा सणांच्या काळात ही फी माफ केली जाते. याशिवाय डॉक्युमेंटेशन चार्जेस किंवा स्टँप ड्युटीसारखे कोणतेही हिडन चार्जेस नाहीत ना, याची खात्री करून घ्या.
सिबिल स्कोअरचा प्रभाव
तुमचा सिबिल स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असल्यास बँका कमी व्याजदरात आणि सहजतेने लोन देतात. लोन अर्ज करण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घ्या, कारण कमी स्कोअर असल्यास तुम्हाला जास्त व्याजदर मोजावा लागू शकतो.
कर्जाचा कालावधी
कार लोन सामान्यतः 1 ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी मिळते. दीर्घकालीन कर्ज घेतल्यास मासिक ईएमआय कमी येतो, पण तुम्हाला व्याजाच्या रुपाने जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे शक्य तितक्या कमी कालावधीचे कर्ज निवडणे फायदेशीर ठरते.
प्री-क्लोजर आणि फोरक्लोजर चार्जेस
मुदतीपूर्वी कर्ज पूर्ण भरल्यास किंवा वेळेआधी बंद केल्यास काही बँका त्यावर पेनल्टी (दंड) आकारतात. कर्ज घेण्यापूर्वी फोरक्लोजर चार्जेस झिरो किंवा अत्यंत कमी आहेत का, हे बँकेकडून स्पष्ट करून घ्या.
डाऊन पेमेंटचे गणित
काही बँका कारच्या ऑन-रोड किमतीवर 100 टक्के लोन देतात, तर काही गाड्यांच्या किमतीच्या 80-90 टक्के कर्ज देतात. तुम्ही जितके जास्त डाऊन पेमेंट कराल, तितके कर्जाचे ओझे आणि मासिक व्याज कमी होईल.
ईएमआय आणि उत्पन्नाचे प्रमाण
तुमच्या दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 30 टक्के पेक्षा जास्त रक्कम कारच्या ईएमआयमध्ये जाणार नाही, याची काळजी घ्या. अन्यथा महिन्याच्या इतर खर्चाचे आणि बचतीचे गणित बिघडू शकते.
कारची ऑन-रोड किंमत
कार लोन नेहमी एक्स-शोरूम किमतीवर नसून विमा, आरटीओ टॅक्स आणि इतर खर्च मिळून तयार होणाऱ्या ऑन-रोड किमतीवर आधारित असावे, जेणेकरून तुम्हाला खिशातून जास्तीचे पैसे लावावे लागणार नाहीत.
विविध बँकांच्या ऑफर्सची तुलना
शोरूममध्ये मिळणाऱ्या फायनान्स पर्यायांवर डोळे मिटून विश्वास ठेवण्याऐवजी इंटरनेटवर विविध बँकांच्या कार लोन ऑफर्सची, त्यांच्या व्याजदरांची आणि अटींची नीट तुलना करा.
करारातील अटी व नियम
लोन ॲग्रिमेंटवर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी व नियम (Terms and Conditions) काळजीपूर्वक वाचा. बाऊन्स चार्जेस, लेट पेमेंट पेनल्टी यांसारख्या गोष्टींची आधीच माहिती करून घ्या.
