PMC बँक खातेधारकांना दिलासा, 'या' अटीवर काढता येणार 50 हजार

वैद्यकीय किंवा शैक्षणिक खर्चाच्या कारणास्तव आता पीएमसी खातेधारकांना बँक अकाऊण्टमधून 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.

PMC बँक खातेधारकांना दिलासा, 'या' अटीवर काढता येणार 50 हजार

मुंबई : पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय किंवा शैक्षणिक खर्चाच्या कारणास्तव आता पीएमसी खातेधारकांना बँक अकाऊण्टमधून 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता (PMC Bank Withdrawl Limit Increased) येणार आहे.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘पीएमसी बँक खातेदार आता मेडिकल/शिक्षण इमरजन्सीसाठी अधिक 50 हजार रुपये त्यांचा खात्यातून काढू शकणार’ असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

वैद्यकीय, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठीच खातेदाराला ही रक्कम काढता येणार आहे. पीएमसी बँकेमधून रक्कम काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध रद्द करावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या 4 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पीएमसी बँक घोटाळा दिवसेंदिवस गंभीर रुप घेत आहे. निर्बंधांविरोधात काही खातेधारकांनी मंगळवारी आझाद मैदानावर आंदोलन केलं. आर्थिक ताण सहन न झाल्यामुळे गेल्या काही दिवसात पाच खातेधारकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पीएमसी बँकेबाबत कोणताही निर्णय लागत नसल्याने खातेधारक चिंतेत होते. ही परिस्थिती लक्षात घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत (PMC Bank Withdrawl Limit Increased) केली आहे.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

14 ऑक्टोबर रोजी पीएमसी बँकेतून काढण्याची रक्कम 10 हजारांवरुन 40 हजार रुपये करण्यात आली होती. आर्थिक अनियमितता आढळल्याने आरबीआयने या बँकावर निर्बंध लागू केले होते.

आरबीआयने आतापर्यंत चार वेळा पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. सुरुवातीला आरबीआयने ग्राहकांना महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांवर नेली. हे 10 हजार एकावेळी किंवा टप्प्याटप्प्यात काढण्याची मुभा होती.

बँकेवर कोणकोणते निर्बंध?

रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही
जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही
बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही
नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत
बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही
कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग, स्टेशनरी, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल
वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *