शेअर बाजार विक्रमी गडगडला, 2 दिवसांत गुंतवणूकदारांचं 5 लाख कोटी रुपयांचं नुकसान
शेअर बाजाराला मोदी सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प काही पचनी पडलेला दिसत नाही. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारनंतर सोमवारीही मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजाराचा निर्देशांक (sensex) 792.82 अंकांनी घसरुन 38,720.57 अंकांवर बंद झाला.

मुंबई : शेअर बाजाराला मोदी सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प काही पचनी पडलेला दिसत नाही. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारनंतर सोमवारीही मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजाराचा निर्देशांक (sensex) 792.82 अंकांनी घसरुन 38,720.57 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज अर्थात निफ्टी 246.75 अंकांनी घसरुन 11,564.40 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील 30 पैकी 25 आणि निफ्टी 50 पैकी 44 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाचा मोठा फटका शेअर बाजाराला बसला.
शुक्रवारी 5 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर शेअर बाजारात मोठी उलथापालट पाहायला मिळाली. त्यानंतर शुक्रवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल 5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. मोदी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प हा मार्केट फ्रेंडली नसल्याने बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं जाणकारांनी सांगितलं.
बीएसई लिस्टेड सर्व कंपन्यांचं बाजारातील एकूण भांडवल हे 153.58 लाख कोटी रुपये इतकं होतं. जे सोमवारी 11.40 वाजताच्या जवळपास 148.43 लाख कोटींपर्यंत घसरलं.
बाजारात मोठी उलथापालट होत असल्याने सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मोठ्या विक्रीमुळे निर्देशांकांत 2.29 टक्क्यांची घट झाली. त्यामुळे निर्देशांकांत जवळपास 900 अंकांची घसरण पाहायला मिळाली. हा अर्थसंकल्प शेअर बाजाराच्या दृष्टीने नुकसानदायक असल्याने परदेशी गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करत आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.
या अर्थसंकल्पात काहीही नवीन नाही आणि यामुळे बाजार समाधानी नाही. यामध्ये एफपीआयसाठी दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅक्स वाढविण्यात आला आहे, यामुळे बाजाराला नुकसान होत आहे. या अर्थसंकल्पातील काही निर्णयांमुळे येणाऱ्या काळात बाजाराला आणखी नुकसान पोहोचू शकतं, असं आयडीबीआय कॅपिटल मार्केटचे रिसर्च हेड एके प्रभाकर यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
अर्थसंकल्पामुळे तुमच्या आयुष्यात या 10 गोष्टी बदलणार
बजेटपूर्वी सोने दर 34 हजार 300, दोन तासात सोने दरात 1400 रुपये वाढ