शिक्षण 10 वी, पगार 80000… कोट्यवधी नोकऱ्यांचा पेटारा उघडणार; तरूणांसाठी मोठी खुशखबर
India Jobs 2030 : पुढील चार वर्षांत भारतात सुमारे 1.6 कोटी ते 2.1 कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या नोकऱ्यांसाठी मोठी पदवी किंवा उच्च शिक्षणाची गरज असणार नाही.

देशातील बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील चार वर्षांत भारतात सुमारे 1.6 कोटी ते 2.1 कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या नोकऱ्यांसाठी मोठी पदवी किंवा उच्च शिक्षणाची गरज असणार नाही, केवळ मूलभूत कौशल्ये असली तरी चांगला रोजगार मिळणार आहे. अलिकडील एका अहवालानुसार, भारतातील गिग इंटरनेट वर्कफोर्स म्हणजेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच क्षेत्रात आता आणखी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
देशात सध्या सुमारे 60 लाख लोक गिग वर्कर म्हणून काम करतात, 2030 पर्यंत ही संख्या तिप्पट होण्याचा अंदाज आहे. डिलिव्हरी पार्टनर, कॅब किंवा ऑटो चालक, तसेच एसी रिपेअर, प्लंबर, ब्युटीशियन यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या कामांसाठी कॉलेजच्या पदव्यांची गरज नसून वाहन चालवण्याचे कौशल्य, स्मार्टफोनचा वापर आणि काही मूलभूत तांत्रिक कौशल्ये आवश्यक आहेत. त्यामुळे कमी शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठीही हे क्षेत्र रोजगार निर्माण करून देत आहे.
रोजगार कुठे मिळणार?
रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सने एक अहवाल सादर केला आहे. यानुसार 2030 पर्यंत देशातील बिगर कृषी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या एकूण रोजगारांपैकी 70 टक्के रोजगार गिग इकॉनॉमीमधून उपलब्ध होतील. यामध्ये सर्वाधिक संधी कॅब आणि ऑटो सेवा क्षेत्रात असतील. या क्षेत्रात 2030 पर्यंत 1.2 कोटी ते 1.4 कोटी लोक कार्यरत असतील. त्यानंतर फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरी क्षेत्रात 50 ते 70 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. तसेच होम सर्व्हिसेस क्षेत्रातही हजारो नवीन रोजगार निर्माण होतील.
पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी संधी
या क्षेत्राचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यामुळे प्रथमच रोजगार मिळणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळत आहे. अहवालानुसार, 2030 पर्यंत गिग वर्कफोर्समध्ये सहभागी होणाऱ्यांपैकी 30 टक्क्यांहून अधिक तरूण पहिल्यांदाच रोजगार करणारे असतील. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सध्याच्या गिग वर्कर्सपैकी 54 टक्के लोकांनी सांगितले की, ओला, उबर, झोमॅटो, स्विगी यांसारख्या प्लॅटफॉर्मसोबत काम करण्यापूर्वी त्यांच्याकडे कोणतीही स्थिर पगाराची नोकरी नव्हती.
कमी शिक्षणातही चांगली कमाई
गिग इकॉनॉमीमध्ये कमाईही आकर्षक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एका पूर्णवेळ गिग वर्करचे तासाचे सरासरी उत्पन्न 138 रुपये आहे. मासिक उत्पन्नाचा विचार केला तर होम सर्व्हिस व्यावसायिक 70,000 ते 80,000, कॅब चालक 37,000 ते 39,000, डिलिव्हरी पार्टनर 22,000 ते 23,000 रुपये कमवू शकतो.
