‘तो’ फोटो वेबसाईटवर टाकायची धमकी देऊन तो 1, 2 नव्हे तब्बल 24 महिलांना करत होता ब्लॅकमेल, अन् मग..
आरोपीने कोविड लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यास सुरुवात केली कारण त्याच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. पकडले जाण्याच्या भीतीने तो महिलांना ब्लॅकमेल करून 5 ते 10 हजार अशी छोटी-मोठी रक्कम उकळ असे.

Maharashtra crime : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारी बातमी समोर आली आहे. एका कॅब ड्रायव्हरने महिलांचे सोशल मीडिया (Social Media) अकाउंट हॅक करून त्यांच्याकडून पैसे उकळले. त्याने त्यांचे अकाऊंट हॅक केले आणि त्यांचे मॉर्फ केलेले फोटो (Morphed Photographs) प्रौढांच्या वेबसाइटवर अपलोड (Adult Website)करण्याची धमकी दिली. कॅब ड्रायव्हरने सुमारे 24 महिलांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याचे समोर आले आहे.
अजय उर्फ विनोद मुंडे (वय २५) असे आरोपीचे नाव असून व्हीपी रोड पोलिसांनी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या या कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हीपी रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे हा फेसबुकवर महिलांना एका लिंकसह मेसेज पाठवत असे. ज्या महिला त्या मेसेजवर क्लिक करायच्या त्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक व्हायचे. यानंतर मुंडे हा त्या महिलांना त्यांची मॉर्फ केलेली छायाचित्रे अश्लील वेबसाईटवर अपलोड करायची धमकी द्यायचा व ब्लॅकमेल करून पैसे उकळायचा.
पोलिस निरीक्षक संतोष धनवटे यांनी सांगितले की, तरूणी आणि महिलांचे फेसबुक अकाउंट ॲक्सेस केले की, आरोपी त्या महिलांच्या अकाऊंटवरून त्यांच्या इतर मित्र-मैत्रिणींनाही लिक पाठवून त्यांचेही अकाऊंट हॅक करायचा. आरोपी नंतर मुलींना संदेश पाठवायचा की त्यांची छायाचित्रे किंवा व्हिडिओ अश्लील वेबसाइटवर अपलोड केले गेले आहेत. तो त्यांना त्यांचे मॉर्फ केलेला फोटो पाठवायचा आणि तो हटविण्यासाठी पैशांची मागणी करायचा.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, तो महिलांना ब्लॅकमेल करून 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत छोटी-मोठी रक्कम उकळायचा. कमी पैशांची मागणी केली तर महिला पोलिसांकडे अशा घटनांची तक्रार करणार नाहीत, असे त्याला वाटले होते. मात्र 3 महिलांनी पोलिसांशी संपर्क साधला असून आरोपीला लातूर येथून अटक करण्यात आली आह. आरोपी कॅब चालक हा वारंवार लातूर, नांदेड, परभणी, परळी येथे जात असे.
