जनावरांच्या चाऱ्यातून दारूची तस्करी, चंद्रपूरमध्ये 37 लाख रुपयांचा माल जप्त

चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारु तस्करीवर मोठी कारवाई केलीय. चंद्रपूर शहरालगत घंटा चौकी भागात पोलिसांनी 37 लाख रुपयांच्या अवैध देशी दारूचा ट्रक पकडलाय.

  • निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 19:27 PM, 24 Jan 2021
जनावरांच्या चाऱ्यातून दारूची तस्करी, चंद्रपूरमध्ये 37 लाख रुपयांचा माल जप्त

चंद्रपूर : चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारु तस्करीवर मोठी कारवाई केलीय. चंद्रपूर शहरालगत घंटा चौकी भागात पोलिसांनी 37 लाख रुपयांच्या अवैध देशी दारूचा ट्रक पकडलाय. जिल्हाभर अवैध व्यवसायाला मोकळीक दिल्याचा आरोप होत असताना ही कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आलंय. पोलिसांनी वाशीम जिल्ह्यातून मूल शहरात जाणारी अवैध तस्करीची दारू जप्त केलीय. आरोपी जनावरांच्या चाऱ्यात लपवून दारूची तस्करी करत होते. दारूच्या ट्रकसोबत 2 आरोपींना अटक करण्यात आलीय (Chandrapur Police action against illegal Alcohol).

वाशिम जिल्ह्यातून मूल येथे दारूतस्करी करणारा ट्रक जप्त करण्यात आलाय. ही कारवाई म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आलेलं मोठं यश मानलं जातंय. चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटाचौकीजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे 37 लाख 47 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोन तस्करांनाही अटक करण्यात आली. नकिब खान अमनुल्ला खान, मोहम्मद अब्दुल मोहम्मद सलीम अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावं आहेत.

विशेष म्हणजे, जनावरांच्या चाऱ्यात लपवून दारूतस्करी केली जात होती. दारूतस्करी आणि अन्य अवैध व्यवसायांवर आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी 8 पथकं तयार केली आहेत. या पथकाद्वारे जिल्हाभर पाळत ठेवली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या तस्करीची गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथून ट्रकद्वारे मूल येथील प्रफुल्ल दिलोजवार याच्याकडे दारूचा पुरवठा होत होता.

यानंतर पथकाने चंद्रपूर-मूल मार्गावर नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू केली. संशयित ट्रकची तपासणी केली असता गुरांच्या चाऱ्यात देशीदारूचा साठा लपवल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तेथून देशी दारूच्या 70 पेट्या आणि ट्रक जप्त केला. त्याची किंमत सुमारे 37 लाख 47 हजार रुपये आहे. यावेळी नकिब खान अमनुल्ला खान, मोहम्मद अब्दुल मोहम्मद सलीम (दोघेही रा. वाशिम) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एक आरोपी प्रफुल्ल दिलोजवार हा फरार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली.

हेही वाचा :

‘जो पाजील माझ्या नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, दारुमुक्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनोखं अभियान

गुजरातमध्ये अवैधरित्या तस्करी केला जाणारा लाखोंचा मद्यसाठा जप्त

निफाड पोलिसांची मोठी कारवाई, 74 लाखांचा मुद्देमालासह 4 जणांना अटक, युवासेनेच्या शहरप्रमुखाचाही समावेश

व्हिडीओ पाहा :

Chandrapur Police action against illegal Alcohol