पोलिसांना वाटलं झालं अपहरण, पण ती तर तिच्या मर्जीनेच…17 वर्षांनी उघड झालं सत्य
Kidnapped Woman Found After 17 Years : 17 वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या महिलेचा शोध लागला. मात्र त्यानंतर ते सत्य समोर आलं ते ऐकून पोलिसही चक्रावले.

नवी दिल्ली : 17 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीच्या अपहरणाचे गूढ दिल्ली पोलिसांनी उकलले आहे. दिल्ली पोलिसांच्या ईशान्य जिल्ह्यांतर्गत सीमापुरी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी (Seemapuri Police Station) 17 वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीची सुटका करण्यात यश मिळवले आहे. अपहरण (Kidnapped) झालेली मुलगी त्यावेळी 16 वर्षांची होती आणि आता ती 33 वर्षांची आहे. ही महिला गोकुळपुरीत सापडली आहे. 2006 मध्ये मुलीच्या कुटुंबीयांनी गोकलपुरी पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र ती मुलगी सापडल्यानंतर एक वेगळंच सत्य समोर आले आहे.
शाहदरा जिल्ह्याचे डीसीपी रोहित मीना, सीमापुरी पोलिस स्टेशन टीमच्या म्हणण्यानुसार, 22 मे रोजी सीमापुरी पोलिस स्टेशनच्या टीमला एक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सदर महिलेची माहिती घेतली असता जे समोर आलं ते धक्कादायक होतं. त्या वेळी बेपत्ता झालेल्या मुलीचे अपहरण झाले नव्हते तर ती स्वतःच्या इच्छेनेच घर सोडून गेली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर ती उत्तर प्रदेशातील बलिया येथे दीपक नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचे आढळून आले. इतके दिवस पोलिस ज्याला अपहरणाचा प्रकार समजत होते, ते तर खरं नव्हतच.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या मुलीच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून 2006 मध्ये दिल्लीतील गोकुळपुरी पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, मुलीचे 2006 मध्ये अपहरण करण्यात आले होते. मात्र तपासादरम्यान मुलीने सांगितले की स्वत:च्या मर्जीने घराबाहेर पडली होती आणि त्यानंतर ती उत्तर प्रदेशमधील एका गावात दीपक नावाच्या व्यक्तीसोबत राहत होती. इतकी वर्ष ते एकत्र रहात होते मात्र काही वाद झाल्यानंतर लॉकडाऊनदरम्यान तिने दीपकचे घर सोडले व ती गोकुळपुरी येथे वेगळी राहू लागली.
डीसीपी शाहदरा रोहित मीना यांच्या म्हणण्यानुसार, शाहदरा जिल्ह्यातून 2023 मध्ये आतापर्यंत 116 अपहरण झालेल्या व्यक्ती आणि 301 बेपत्ता व्यक्ती सापडल्या आहेत. डीसीपींच्या म्हणण्यानुसार, सुरक्षित सापडलेल्या महिलेला गोकलपुरी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई गोकुळपुरी पोलीस करणार आहे.
