आई-वडीलांनीच तान्ह्या बाळाचा गळा घोटाळा आणि मृतदेह नदीच्या पुलाखाली फेकला
मुळा पुलाखाली एका तीन ते चार महिन्याच्या तान्हुल्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. आई-वडिलांनीच त्याचा खून करून, विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नदीच्या पुलाखाली फेकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रत्यक्ष जन्मदात्या आई-वडीलांनीच आपल्या तान्ह्या बाळाचा गळा घोटून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पालकांनी या तान्ह्या मुलाचे कलेवर कारमधूननेत नदीच्या पुलाखाली टाकून दिले होते होते. संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात ४ डिसेंबर रोजी मुळा नदीच्या पुलाखाली एका तीन महिन्याचा बाळाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांना संशय आल्याने तपासाची चक्र फिरली आणि पोलिस त्या गावापर्यंत पोहचले. पालकांनी हे धक्कादायक पाऊल का उचलले हे ऐकून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल अशी ही घटना आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात 4 डिसेंबर रोजी मुळा नदीच्या पात्रात एका बाळाचा मृतदेह तरंगताना दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. पोलिसांनी या बाळाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि घारगाव पोलिस दोघांना या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला.
या बाळाच्या मृतदेहाला नदीत फेकण्यासाठी वापरलेली कार ही जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने भोकरदन येथे जाऊन आरोग्य केंद्र, आशा सेविका आणि गोपनिय माहितीचे आधारे तपास केला. पोलिसांनी या कारच्या मालकाकडे जाऊन चौकशी केली. त्यानंतर चालक हरिदास गणेश राठोड यांची चौकशी केली. त्यानंतर या बाळाच्या आई-वडीलांकडेच संशयाची सुई गेली. त्यानंतर पोलिसांनी बाळाचे वडील प्रकाश पंडित जाधव ( वय.३७, रा. भिवपूर, ता. भोकरदन, जि. जालना), आई कविता प्रकाश जाधव (वय ३२) तसेच गाडी चालक हरिदास गणेश राठोड (वय ३२, रा. आव्हाणा, ता. भोकरदन, जि. जालना) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवतात या शिवांश नावाच्या बाळाला आपण आपल्या हाताने संपवल्याचे पालकांनी कबुल केले.
शिवांश असाध्य आजार होता
शिवांश ऊर्फ देवांश याला असाध्य आजार होता. या बाळाला अनेक डॉक्टरांना दाखवण्यात आले. परंतू बहुतेक डॉक्टरांनी हे बाळ पूर्ण बरे होणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे आजाराने ग्रस्त असलेल्या बाळाचाच गळा दाबून त्याचा खून केला गेला. कविता जाधव हिच्या नातेवाईकांनी त्यांच्या बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झाले असून त्यास ३ ते ४ दिवसांमध्ये रुग्नालयातून सोडणार असल्याची अफवा पसरविली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात मुळा नदीच्या पुलाखाली या बाळाच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्नावस्थेत नदीच्या पुलाखाली फेकण्यात आले आणि पालक पसार झाले.
