बहिणीने पाठवलेली लिंक पडली महागात, कल्याणमधील महिला गमावून बसली 60 लाख, नेमकं काय घडलं?
कल्याणमधील एका महिलेला ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये ६० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. भामट्यांनी जास्त नफ्याचे आमिष दाखवून तिला टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवण्यास भाग पाडले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. त्यातच आता कल्याण शहरात ऑनलाईन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल ६० लाख ५५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नेमंक काय घडलं?
कल्याणच्या बेतुरकरपाडा परिसरात राहणारी एक महिलेला शेअर मार्केटमधून झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवून गंडा घालण्यात आला आहे. ही महिला मुंबईतील एका विमा कंपनीत नोकरी करत होती. मे महिन्यात तिला तिच्या बहिणीमार्फत ऑनलाईन शेअर गुंतवणुकीची एक लिंक मिळाली. सुरुवातीला तिने ९९९ रुपये भरून एक छोटा कोर्स केला. त्यानंतर पंकज भारद्वाज, गोपाळ लोराया, भाग्यश्री आणि प्रीती या चार व्यक्तींकडून सतत गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शनपर मेसेज आणि लिंक्स येऊ लागल्या.
या चार भामट्यांनी महिलेला सुरुवातीला ५० हजार, नंतर १ लाख असे टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवायला लावले. याद्वारे महिलेने एकूण ६० लाख ५५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर तिला तिच्या खात्यात तब्बल ५८ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, हा नफा काढायचा असल्यास, आणखी ८० लाख रुपये भरावे लागतील, अशी अट घालण्यात आली.
आरोपींचा शोध सुरु
एवढी मोठी रक्कम भरण्याची अट ऐकून महिलेला संशय आला. तिने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्या भामट्यांनी तिच्याशी संपर्क साधणे बंद केले. यानंतर त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सायबर गुन्हे शाखेची मदत घेऊन पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांचे आवाहन
या घटनेमुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. तसेच, जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही ऑनलाईन गुंतवणुकीपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची पूर्णपणे पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
