अश्लील चित्रपट प्रकरणात Shilpa Shetty चा सहभाग आहे का? जुहूतील घरी 6 तास चौकशी

राज कुंद्राला 19 जुलैला अटक केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर काल कोर्टात हजर केलं असता 27 जुलैपर्यंत त्याच्या पोलीस कोठडी वाढ करण्यात आली आहे.

अश्लील चित्रपट प्रकरणात Shilpa Shetty चा सहभाग आहे का? जुहूतील घरी 6 तास चौकशी
Shilpa-Raj

मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) राहत्या घरी पोलीस चौकशी करण्यात आली. शिल्पाच्या जुहूमधील आलिशान घरात क्राईम ब्रांचने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला होता. अटकेत असलेला उद्योजक आणि शिल्पाचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात तिचाही सहभाग आहे का, याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली. राज कुंद्राला घेऊन क्राईम ब्रांचची टीम त्यांच्या घरी गेली होती. शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर सहा तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले.

राज कुंद्राला 19 जुलैला अटक केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर काल कोर्टात हजर केलं असता 27 जुलैपर्यंत त्याच्या पोलीस कोठडी वाढ करण्यात आली आहे.

शिल्पा शेट्टीला कोणते प्रश्न विचारले?

विआन कंपनीच्या संचालक पदावर शिल्पा शेट्टी किती काळ होती? तिला अश्लील चित्रपट निर्मितीबाबत काही कल्पना होती का? या रॅकेटचा कारभार विआन कंपनीच्या ऑफिस मधून चालत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे 2020 मध्ये तिने विआन कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा का दिला होता? असे सवाल शिल्पाला विचारल्याची माहिती आहे. शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांचाही तपास केला जाणार आहे

राज कुंद्राच्या घरावर छापा

गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना त्याच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राजला याबाबत विचारले असता, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेले नाही, असा दावा त्याने केला.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI