अवघ्या पाच दिवसांवर लग्न, पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू

लग्न अवघ्या पाच दिवसांवर आले असताना नवरदेवाचा मृत्यू झाल्याने नांदेडमधील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Nanded Bike Accident Groom Dies)

  • राजीव गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड
  • Published On - 17:12 PM, 2 Apr 2021
अवघ्या पाच दिवसांवर लग्न, पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू
नांदेडमध्ये बाईक अपघातात नवरदेवाचा मृत्यू

नांदेड : लग्नघटिका अवघ्या पाच दिवसांवर आली असताना नवरदेवाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. स्वतःच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या नवरदेवाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या दुर्दैवी घटनेमुळे नांदेडमदील हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nanded Bike Accident Groom Dies while going for Wedding Invitation)

पत्रिका देण्यास गेलेला नवरदेव परतलाच नाही

हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा इथल्या 25 वर्षीय उत्तम शिराणे या युवकाचे येत्या सात एप्रिल रोजी लग्न होते. लगीनघाई असल्याने जवळच्या नातेवाईकांना लग्न पत्रिका देण्यासाठी उत्तम मोटारसायकलवर स्वार होऊन नांदेडकडे आला होता. काल रात्री तो घरी परत आलाच नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबाने शोधाशोध सुरु केली.

भोकर फाट्याजवळ मृतेदह आढळला

दरम्यान आज पहाटे एका युवकाचा अपघात झाल्याचं समोर आलं. भोकर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने रात्रीच्या वेळी दिलेल्या धडकेत संबंधित तरुण अपघातग्रस्त झाला होता. या प्रकरणी बारड इथल्या महामार्ग सुरक्षा पथकाने पाहणी केली. मात्र त्याआधीच युवकाचा मृत्यू झाला होता. मृतदेहाची तपासणी केली असता तो नवरदेव उत्तमचा असल्याचे समोर आले.

लग्नाच्या तोंडावर कुटुंबावर शोककळा

मयत नवरदेव उत्तमच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलिसांनी अज्ञात वाहनांच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, रात्रीला नेमक्या कोणत्या वाहनाने धडक दिली याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान अर्धापुर पोलिसांसमोर आहे. लग्न अवघ्या पाच दिवसांवर आले असताना अश्याप्रकारे नवरदेवाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण हिमायतनगर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

कालबाह्य प्रथांनी जीव घेतला

आपल्याकडे घरी लग्न असल्यानंतर जवळच्या नातेवाईकांना मूळ-पत्रिका देण्याची प्रथा आहे. मूळ म्हणजे हळद, भरड सुपारी, अक्षता, धागा यांचे मिश्रण देऊन लग्नाला आमंत्रित करणे होय. घरी मूळ पत्रिका आली म्हणजे लग्नाला जावेच लागते अशी प्रथा आहे. हे मूळ पत्रिका वाटताना अनेकदा नवरदेव, त्याचा भाऊ किंवा वडिलांचे अपघात होत असतात.

आता सर्वांच्या हातात मोबाईल आहेत, यावरून देखील लग्नाला निमंत्रण देता येऊ शकते. मात्र तरीही जुनी झालेली मूळ पत्रिका देण्याची प्रथा आपण सोडायला तयार नाही, त्यातून उत्तम सारख्या नवरदेवांचा बळी जातो. त्यामुळे आता तरी जुनाट आणि वेळखाऊ पद्धती बदलण्यावर समाजाने लक्ष देण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

वहिनीचं वैधव्य दूर केलं, भावाच्या मृत्यूनंतर पुतणीसाठी वहिनीशी लग्न

(Nanded Bike Accident Groom Dies while going for Wedding Invitation)