भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरण, संशयित आरोपी महिन्याभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत?

राजकीय युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित आरोपी हा राष्ट्रवादीच्या कामगार वंचित आघाडीचा पदाधिकारी असल्याचं बोललं जातं. त्याने महिन्याभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरण, संशयित आरोपी महिन्याभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत?
Amol Ighe

नाशिक : नाशिकमधील (Nashik) सातपूरचे भाजप (BJP) मंडल अध्यक्ष अमोल इघे (Amol Ighe Murder) यांच्या निर्घृण हत्येनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच इघेंची हत्या करणारा संशयित आरोपी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन केला. त्यांना घराबाहेर बोलावून धारदार शस्त्राने वार करत इघेंची निर्घृण हत्या केली. नाशिकमधील कार्बन नाका परिसरात ही घटना घडली. या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पहाटे सहा वाजता नेमकं काय घडलं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

संशयित आरोपी राष्ट्रवादीचा पदाधिकारी

राजकीय युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित आरोपी हा राष्ट्रवादीच्या कामगार वंचित आघाडीचा पदाधिकारी असल्याचं बोललं जातं. त्याने महिन्याभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाल्याचीही माहिती आहे.

रुग्णालय परिसरात समर्थकांची गर्दी

दरम्यान, नाशिक शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात अधिकची कुमक बोलावून घेतली आहे. भाजप सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली आहे.

पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी

भाजप नेत्यांनीही सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालं आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करा, अशी मागणी भाजप नेत्यांनी उचलून धरली आहे. यावेळी समर्थकांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमकही उडाली. भाजप नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.

अवघ्या चार दिवसात नाशिकमधील हत्येची ही तिसरी घटना धडल्याचं समोर आलं आहे. नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीची हत्या

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी जामिनावरुन तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची घटना नाशिकमधील पंचवटी परिसरात घडली होती. प्रवीण काकड असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रवीण हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

संबंधित बातम्या :

नाशकात भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून

नाशिकमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या

Published On - 2:46 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI