शाहरुखसारखे आमीरवरही भाड्याने राहाण्याची वेळ, 4 लक्झरी फ्लॅट घेतले भाड्याने, भाडे ऐकाल तर चाट पडाल
अभिनेता शाहरुख खान सारखे आता आमीर खान देखील भाड्याने राहणार आहे. दोन्ही स्टारना अशा प्रकारे भाड्याने राहण्याची वेळ का आली हे पाहाणे महत्वाचे आहे.

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान सारखा आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान देखील मुंबईत भाड्याच्या घरात राहणार आहे.त्याने वांद्रे पश्चिमेच्या पाली हिलमध्ये चार लक्झरी अपार्टमेंट भाड्यावर घेतले आहेत. याच पॉश भागात शाहरुख देखील भाड्याने राहात आहे. ज्या हाऊसिंग सोसायटीत आमीर खान रहातो त्या इमारतीचा पुनर्विकास सुरु आहे. त्यामुळे आमीरने चार फ्लॅट भाड्याने घेतले आहेत. त्यासाठी दर महिन्याला आमीर २४.५० लाख भाडे भरणार आहे.
एका वेबसाईटच्या मते आमीर खानने चारही फ्लॅट पाच वर्षांसाठी घेतले आहेत. हा भाडेकरार मे २०२५ पासून सुरु झाला असून मे २०३० पर्यंत रहाणार आहे. यात ४५ महिन्यांचा लॉक इन पिरिएड देखील आहे. आमीरने या फ्लॅट्ससाठी १.४६ कोटी रुपये सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट जमा केले आहे. प्रॉपर्टी रेंटवर घेण्यासाठी ४ लाख रुपयांची स्टँप ड्यूटी आणि २००० रुपये रजिस्ट्रेशन फि देखील दिली आहे. विशेष म्हणजे या फ्लॅट्सचे भाडे दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढणार आहे.
आमीरच्या हाऊसिंग सोसायटीचा कायाकल्प होणार
सध्या आमीर खान विरगो कॉम्प्लेक्स मध्ये राहातात. या सोसायटीत आमीरचे १२ फ्लॅट्स आहेत. रि-डेव्हलपमेंटनंतर तेथे अल्ट्रा प्रिमीयम सी फेसिंग अपार्टमेंट असतील.ज्याची किंमत १ लाख प्रति चौरस फूट दराहून अधिक असणार आहे. यातील काही नव्या फ्लॅट्सची किंमत सध्या १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या भागात राहातात अनेक अभिनेते
आमीरचा नवा पत्ता आता विलनोमोना अपार्टमेंट असणार आहे. हा शाहरुखच्या पूजा कासापासून ७५० मीटर दूरवर आहे. बँड स्टँड येथील शाहरुखच्या मन्नत बंगल्याचे नुतनीकरण सुरु आहे. त्यामुळे शाहरुख पूजा कासात भाड्याने रहातोय. वांद्रे पश्चिमेत अनेक मोठे स्टार राहातात. यात सलमान खान, करीना कपूर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट तसेच रेखा यांच्या सारख्या स्टारचे घर आहे. लवकरच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण देखील येथेच शिफ्ट होणार आहेत.
