नाना पाटेकर मराठी असल्यामुळे…तनुश्री दत्ताचे खळबळजनक आरोप!
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. माझ्यासोबत सुशांतसिंह राजपूत याच्यासारखं करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं तिने म्हटलंय.

Tanushree Dutta : अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने माझ्याच घरात माझा छळ होत आहे, असा दावा केला होता. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्टक करून तिने या संदर्भात आरोप केले आहेत. माझा मोबाईल, इमेल हॅक करण्यात आला आहे, असंही तिने या व्हिडीओत सांगितलंय. त्यानंतर आता तिने दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. याआधीही तनुश्रीने मी टू मोहिमेत पाटेकर यांच्यावर आरोप काही आरोप केले होते.
नाना पाटेकर मराठी आहेत, म्हणूनच…
नाना पाटेकर यांच्या सांगण्यावरून मला धमक्या दिल्या जात आहेत. माझी अवस्था अभिनेता सुशांत सिंगसारखी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॉलीवूड माफिया माझ्या मागे लागला आहे, असा दावा तनुश्रीने केला आहे. आम्ही #MeToo चा गुन्हा दाखल केला तेव्हाही पोलिसांनी आम्हाला मदत केली नाही. नाना पाटेकर हा मराठी माणूस आहे, म्हणूनच पोलीस त्याला पाठिंबा देतात, असाही खळबळजनक आरोप तनुश्रीने केलाय.
तनुश्री एफआयआर दाखल करणार
नाना पाटेकर यांचे राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा फोटो आहे. आम्हाला माध्यमांकडून न्यायाची अपेक्षा आहे. पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळणार नाही, अशी हतबलताही तिने व्यक्त केलीय. तिला दिल्या जात असलेल्या कथित त्रासाबाबत सोमवारी तनुश्री ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करणार आहे, त्यामुळे आता ती एफआयआरमध्ये कोणते आरोप करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मी चार ते पाच चित्रपट करणार होते, पण…
मला वेडं बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे इमेल हॅक्ड आहेत. त्यामुळे त्या लोकांना समजतं की मी कुठे जाते काय करते. 2023 साली मला समजलं की माझा इमेल आयडी हॅक करण्यात आलाय. 2021 मी पुन्हा भारतामध्ये आले होते. मी त्या काळात 4 ते 5 चित्रपट करणार होते. पण ते सर्व चित्रपट रद्द झाले. एका निर्मात्याला धमकी देण्यात आली. नंतर तो गायबच झाला. याबाबत माझ्याकडे पुरावा नाही, मात्र मला समजतं. एक प्रोड्युसर तर भूतानला पळून गेला, असे आरोप तनुश्रीने केले आहेत.
माझ्यासोबत सुशांत सिंगसारखं काहीतरी….
माझ्यासोबत सुशांत सिंहसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण सुशांत सिंहने आत्महत्या केलेली नाही. त्याच्या जेवणात काहीतरी मिसळलं जात होतं. असंच माझ्यासोबत झालं होतं. माझ्याकडे मोलकरीण येणं बंद झालं. एक जास्त वय असलेली मोलकरीण आली तर सिक्युरिटीने तिला पायऱ्यांनी वर पाठवलं. ती एक आठवडा गायब होती. नंतर दहा दिवसांनी ती आली आणि बोलली की मी कामावर येऊ शकत नाही. तुम्ही दुसऱ्या बाईला ठेवा असं तिनं मला सांगितलं. नंतर ती दुसऱ्या बाईला घेऊन आली आणि बोलली दिदी तुम्ही या बाईला कामावर ठेवा. मग मी तिला कामावर ठेवलं. पण ती नवी बाई आल्यानंतर तीन दिवसांनंतर माझ्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. मी 16-18 तास झोपायचे, असा खळबळजनक आरोपही तनुश्रीने केलाय.
