मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर लव्ह ट्रँगलबद्दल अर्जुन कपूर स्पष्टच बोलला..
मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेता अर्जुन कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लव्ह ट्रँगलबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी प्रेमाच्या त्रिकोणाबाबत त्याने स्पष्ट मत मांडलं. मलायका आणि अर्जुन यांचा काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाला.

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. वयातील अंतरावरून या दोघांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगलाही न जुमानता दोघं एकमेकांवर खुलेपणाने प्रेमाचा वर्षाव करायचे. अर्जुन आणि मलायका यांचं ब्रेकअप कशामुळे झालं, यामागचं कारण स्पष्ट झालं नाही. दोघांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन ‘लव्ह ट्रँगल’बद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. आगामी ‘मेरे हसबंज की बिवी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अर्जुनने ही मुलाखत दिली होती. या चित्रपटात प्रेमातील त्रिकोणाबद्दलची (लव्ह ट्रँगल) कथा दाखवण्यात आली आहे.
या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “या परिस्थितीत त्या बिचाऱ्यासोबत जे घडलंय आणि त्याचा भूतकाळ परत येतो कारण तिचा स्मृतीभ्रंश होतो. खऱ्या आयुष्यात अशा परिस्थितीत अडकणं ही मजेशीर गोष्ट नाही. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, कोणीच अशा परिस्थितीमध्ये अडकू नये किंवा स्वत:ला अशा दुहेरी अडचणीत आणू नये. हे योग्य आहे असं मला वाटत नाही. मला खात्री आहे की काही लोकांच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते, जिथे ते दोन लोकांमध्ये अडकतात. पण त्यात काही मजेशीर नसतं. एक ना एक जण दुखावला जातोच. नात्यात राहण्याचा हा काही चांगला मार्ग नाही.”




View this post on Instagram
कॉमेडियन हर्ष गुजरालसुद्धा या मुलाखतीत अर्जुन कपूरसोबत उपस्थित होता. चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना त्याने अर्जुन कपूर अजूनही सिंगल असल्याचा खुलासा केला. मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुनच्या आयुष्यात दुसरी कोणती मुलगी आली नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय. “माझ्याबाबतीत हे खरंय की माझ्या खऱ्या आयुष्यातही सिंगल आहे आणि अर्जुन भावाच्या खऱ्या आयुष्यातही तो सिंगल आहे. त्यामुळे आम्ही हे सर्व फक्त चित्रपटासाठी करतोय”, असं तो म्हणाला.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रेकअप केला. अर्जुनने एका कार्यक्रमात सर्वांसमोर ‘मी आता सिंगल आहे’ असं म्हटलं होतं. त्यानंतर मलायकानेही अप्रत्यक्षपणे रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ब्रेकअपनंतर जेव्हा मलायकाच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा अर्जुन तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. त्यानंतर नुकतीच त्याने मलायकाच्या शोमध्येही पाहुणा म्हणून हजेरी लावली होती.