दिलीपकुमार : अभिनयाचा जादूगार, अभिनेत्रींची पसंती आणि बॉक्सऑफिसचा हुकमी एक्का

मोहम्मद युसूफ खान...अर्थात अभिनेते दिलीपकुमार... हिंदी सिनेमासृष्टीचा पहिला सुपरस्टार..हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला खान अशीही दिलीपकुमार यांची ओळख होती..सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार दिलीपकुमारांनाच मिळाला होता...इतकंच काय सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांनाच मिळालेयत.. | Senior Actor Dilip Kumar Passed Away

दिलीपकुमार : अभिनयाचा जादूगार, अभिनेत्रींची पसंती आणि बॉक्सऑफिसचा हुकमी एक्का
दिलीपकुमार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालंय. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे (Senior Actor Dilip Kumar Passed Away The Magician Of Acting First Superstar Of Bollywood).

मोहम्मद युसूफ खान…अर्थात अभिनेते दिलीपकुमार… हिंदी सिनेमासृष्टीचा पहिला सुपरस्टार..हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला खान अशीही दिलीपकुमार यांची ओळख होती..सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार दिलीपकुमारांनाच मिळाला होता…इतकंच काय सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांनाच मिळालेयत..

1944 मध्ये ज्वारभाटा या चित्रपटाद्वारे दिलीपकुमारांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. पुढे पाच दशके म्हणजे 50 वर्षे या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रप्रेमींना भुरळ घातली…65 चित्रपट दिलीपकुमारांच्या नावावर आहेत.अंदाज, आन, दाग, देवदास, आझाद, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, राम और श्याम अशा कित्येक गाजलेल्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे…

1976 नंतर पाच वर्षे दिलीपकुमारांनी अभिनयापासून ब्रेक घेतला. पुनरागमन केले ते क्रांतीसारख्या अजरामर चित्रपटानंच..शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर अशा प्रेक्षकांना आजही भुरळ घालणाऱ्या चित्रपटांनी दिलीपकुमार यांची जादू कायम आहे हे सिद्ध केलं…1998 साली आलेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीपकुमार ‘बॉलिवूडच्या गोल्डन एज’मधला शेवटचा तारा होता. तोही आता निखळून पडला.

आयेशा बेगम आणि लाला गुलाम सरवार खान यांच्या पोटी 11 डिसेंबर 1922 ला दिलीपकुमारांचा जन्म झाला. ते 12 भावंडांपैकी एक अपत्य होते. सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरमधला त्यांचा जन्म. वडील फळविक्रेते आणि सावकार होते, त्यामुळं घरात सधनता होती. पेशावर आणि नाशिकच्या देवळालीमध्ये त्यांच्या मालकीच्या फळबागा होत्या. देवळालीच्याच बार्नेस स्कूलमध्ये दिलीपकुमारांचे प्राथमिक शिक्षण झाले. अभिनेते राजकपूर हे दिलीपकुमारांचे बालमित्र. पुढे दोघांनाही हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली.

दिलीपकुमारांचे कुमारवयातच वडलांबरोबर पटले नाही.एका पारसी कॅफवाल्याच्या मदतीनं त्यांनी देवळालीतून थेट पुणे गाठले. कौटुंबिक पार्श्वभूमी न सांगता लेखनकौशल्य आणि इंग्रजीवरचं प्रभुत्वाच्या जोरावर त्यांनी नोकरी मिळवली. पुढं आर्मी क्लबमध्ये त्यांनी सँडविच स्टॉल सुरु केला. स्टॉलचा करार संपल्यावर त्यांनी पुणं सोडून मुंबई गाठली. त्यावेळी त्यांच्याकडे 5 हजार रुपये होते.

1943 ला चित्रपटसृष्टीशी गाठ पडली

1943 ला डॉ. मसानी यांच्याशी दिलीपकुमारांची गाठ पडली. डॉ.मसानी यांनी मालाडच्या बाँबे टॉकीजमध्ये मला मदत कर म्हणून नेले. तिथं दिलीपकुमारांची बाँबे टॉकीजची मालकीण आणि अभिनेत्री देविकाराणी यांच्याशी गाठ पडली. देविकाराणींनी त्यांना महिना 1250 रुपयांवर नोकरीवर ठेवले. महान अभिनेते अशोककुमार यांच्याशी दिलीपकुमारांची भेट झाली. अशोककुमार अभिनय नैसर्गिक करावा अशा मताचे होते. त्याचा दिलीपकुमार यांच्यावर खूप प्रभाव पडला.दिलीपकुमारांचं उर्दूवर खूप चांगलं प्रभुत्व होतं. त्यामुळं बाँबे टॉकीजमध्ये त्यांना सुरुवातीला पटकथा लिहण्याचं काम मिळत गेलं..देविकाराणींनी त्यांना युसूफकुमारऐवजी दिलीपकुमार हे नाव लाव अशी विनंती केली आणि 1944 ला म्हणजे वर्षभरातच ज्वारभाटा चित्रपटात अभिनेत्याची भूमिका दिली. चित्रपटसृष्टीतल्या एका सुपरस्टारचा हा प्रवेश होता..
ज्वारभाटा फ्लॉप ठरला. अजूनही काही सुरुवातीचे सिनेमे फ्लॉपच ठरले. पण दिलीपकुमारांनी हार मानली नाही. तीन वर्षे अशीच गेली. 1947 ला नूरजहाँ अभिनेत्री असलेला जुगनू चित्रपट मात्र हिट ठरला. पुढच्याच वर्षी शहीद आणि मेला हे दोन चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

50 च्या दशकात जणू एकमेव हिरो

1950 ते 60 च्या दशकात जोगन, बाबुल, हलचल, दीदार, तराना, दाग, संगदील, शिकस्त, अमर, उडन खटोला, इन्सानियत असे किती तरी गाजलेले चित्रपट दिलीपकुमारांनी दिले. 1985 च्या दाग चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

देवआनंद यांच्यासोबतचा देवदासही याच दशकातला होता. नया दौर, मधुमती, यहुदी, पैगाम असे कित्येक यशस्वी चित्रपट दिलीपकुमारांनी दिली. ट्रॅजेडी किंग असा बहुमानही त्यांना याच दशकात मिळाला. पण हा बहुमान धोकादायक ठरता ठरता राहिला. अनेक शोककारी पात्रांमध्ये खोल शिरण्याच्या खटाटोपात दिलीपकुमार स्वतःच डिप्रेशनची शिकार झाले. मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर त्यांनी हलकेफुलके चित्रपट करायला सुरुवात केली. 1952 मधल्या आनमध्ये त्यांनी विनोदी भूमिका केली. या चित्रपटाचा प्रिमियर लंडनमध्येही आयोजित केला गेला होता. आझादमधली चोराची भूमिका, रोमँटिक कोहिनूरमधली राजपुत्राची भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन राहिली.

1955 ते 59 दरम्यान ते झपाटल्यासारखं चित्रपटात काम करत राहिले. अभिनय फुलत गेला. डायलॉगवर लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडत गेल्या. गाणी अभिनयासकट लोकांच्या मनात बसत गेली..या दशकात सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या टॉप 30 चित्रपटांमध्ये 9 चित्रपट तर दिलीपकुमारांचेच होते. दिलीपकुमार त्यावेळी एका चित्रपटासाठी 1 लाख रुपये घ्यायचे. म्हणजे सध्याचे रुपयाचे मूल्यमापन लक्षात घेतले तर ते 1 कोटी रुपयांवर जाते.

मुगल-ए-आझमनं इतिहास घडवला

वैजयंतीमाला, मधुमाला, नर्गिस, मीनाकुमारी, निम्मी, कामिनी कौशल अशा त्यावेळच्या आघाडीच्या आणि सुपरहिट अभिनेत्रींबरोबर दिलीपकुमारांची पडद्यासह सहज चपखल जोडी जमत गेली .

1960 साली आलेला मुगल-ए-आझमनं तर इतिहास रचला. सर्वाधिक महागडा चित्रपट तर होताच पण तो इतका यशस्वी ठरला की 11 वर्षे सर्वाधिक पैसा कमावणारा चित्रपट राहिला. 2004 ला रंगीत मुगल-ए-आझम आला होता, म्हणजे त्याची जादू दिलीपकुमार चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यावरही कायम होती. 2011 च्या मूल्यमापनानुसार चित्रपटाचा गल्ला 1 हजार कोटींचा होता. राजपुत्र सलीम आणि त्याच्या तोंडचे संवाद अजूनही लोकांच्या तोंडी राहावे असेच आहेत. 1971 ला
आलेल्या राजेश खन्नांच्या हाथी मेरे साथी आणि 1975 च्या शोलेनंच मुगल-ए-आझमचे विक्रम मोडले.

दिलीपकुमार यांना 1961 ला चित्रपट निर्माता होण्याची हुक्की आली होती. त्यांनी वैजयंतीमालाला घेऊन गंगा जमुना चित्रपटाची निर्मिती केली. पण निर्मितीचं वेड याच चित्रपटाबरोबर संपलं.

ब्रिटीश दिग्दर्शक डेव्हिड लीन यांनी लॉरेन्स ऑफ अरेबिया या इंग्रजी चित्रपटाची दिलीपकुमार यांना ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली. ब्रिटीश अभिनेत्री एलिझाबेथ टेलरसोबतही ताजमहाल चित्रपटासाठी त्यांना ऑफर होती. पण हा चित्रपटच रद्द झाला. एकूणच परदेशी दिग्दर्शकांनाही दिलीपकुमारांच्या अभिनयानं मोहित केलं होतं..

70 च्या दशकात तीव्र स्पर्धेमुळं 5 वर्षे संन्यास

1970 नंतर मात्र त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले. बैराग चित्रपटात वडील आणि दोन भाऊ असा ट्रिपल रोल दिलीपकुमारांनी केला. पण प्रेक्षकांना तो प्रयोग आवडला नाही. राजेश खन्ना आणि संजीवकुमार यांची याच काळात चलती होती. अनेक भूमिका या दोघांनी खेचून घेतल्या. त्यामुळं 1976 ते 1981 अशी पाच वर्षे दिलीपकुमारांनी चित्रपट संन्यास घेतला.

80 च्या दशकात सुभाष घईंनी पुनरागमन गाजवले

1981 साली दिलीपकुमारांनी धडाक्यात पुनरागमन केलं. शशी कपूर,मनोजकुमार,हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिका असलेल्या क्रांती चित्रपटात दिलीपकुमारांची मध्यवर्ती भूमिका होती. देशप्रेमावर आधारीत असलेल्या या चित्रपटानं इतिहास रचला. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकाची दिलीपकुमारांची भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. सुभाष घईंचा हा चित्रपट होता. 82 साली विधाता, 83 साली अमिताभबरोबरच्या जुगलबंदीचा शक्ती चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरडुपर हिट ठरले. शक्तीतल्या भूमिकेसाठी दिलीपकुमारांना सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेर मिळाला. हा त्यांचा शेवटचा म्हणजे आठवा फिल्मफेअर पुरस्कार होता. 1984 चा अनिल कपूरबरोबरचा मशाल फ्लॉप ठरला पण भूमिकेचं कौतुक झालं. 1986 ला दिलीपकुमार-सुभाष घई पुन्हा एकत्र आले आणि कर्मा चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं. अष्टपैलू अभिनेत्री नूतनबरोबरचा त्यांचा हा पहिला चित्रपट होता.

90 च्या दशकातही जादू कायम

1991 ला राजकुमारसोबतचा इलू, इलू वाला सौदागरही दिलीपकुमारांची जादू संपली नाही हेच दाखवून गेला. दिग्दर्शक पुन्हा सुभाष घई. पण दिलीपकुमार यांचा हाच शेवटचा यशस्वी चित्रपट ठरला. 1993 ला त्यांना चित्रपटसृष्टीला सर्वोत्तम योगदान दिल्याबद्दल फिल्मफेअरचा लाइफटाइम अचिवमेंट पुरस्कार देण्यात आला. पाच दशकांच्या यशस्वी कारकिर्दीचा हा गौरव होता.

दिलीपकुमार नुसते अभिनेतेच नव्हे तर भाषाप्रभू होते. इंग्रजी, उर्दू, हिंदी, हिंदको,पंजाबी, मराठी,बंगाली, गुजराती,पर्शियन, अवधी, भोजपुरी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. 2000-2006 साली काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्त केले होते.

पुरस्कार चालत आले

हिंदी चित्रपटसृष्टीतले महान कलाकार म्हणून त्यांची नोंद आहे. गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा अभिनेता अशा विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर आहे. 1980 ते मुंबईचे शेरीफ होते. 1991 ला त्यांना पद्मभूषण मिळाला. 2015 ला पद्मविभूषणने गौरव झाला. 1994 साली दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. पाकिस्ताननं निशाण-ए-इम्तियाज या पुरस्कारानं गौरव केला. तो स्विकारण्याला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला होता. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण केलं. पुढे अटलबिहारी वाजपेयींशी सल्लामसलत करुनच दिलीपकुमारांनी पुरस्कार स्विकारला. उदयतारा नायर यांना दिलीपकुमारांनी आपल्या आयुष्याची वाटचाल कथन केली. त्याचंच पुढं द सबस्टन्स अँड द शॅडो या नावानं दिलीपकुमारांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं.

रोमँटिक आयुष्य

दिलीपकुमारांचे व्यक्तिगत आयुष्यही तितकेच रोमँटिक होते..मधुबालासोबत त्यांनी लग्न केलं नाही, पण त्यांचे अनेक वर्षांचे संबंध होते. नया दौर चित्रपटानंतर दोघांत बेबनाव आला. कोर्टात खटलाही चालला. वैजयंतीमाला दिलीपकुमारांच्या सर्वाधिक चित्रपटात अभिनेत्री होत्या.पडद्यावरची केमिस्ट्री बघून दोघेही वास्तवातसुद्धा प्रेमवीर वाटायचे. मधुमाला व कामिनी कौशलनंतर वैजयंतीमालाचंच नाव दिलीपकुमारांसोबत जोडलं गेलं. 1966 साली त्यांनी अभिनेत्री सायराबानू यांच्याशी निकाह केला. त्या दिलीपकुमारांपेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या. 1981 साली त्यांनी हैदराबादच्या असमा जहाँगीर यांच्यासोबत दुसरा निकाह केला. पण दोन वर्षातच ते लग्न मोडलं. सायराबानू यांनी मात्र दिलीपकुमारांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. दोघांनाही मूल नव्हते. पण आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत राहिले.

Senior Actor Dilip Kumar Passed Away The Magician Of Acting First Superstar Of Bollywood

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI