तुम्ही घराणेशाहीच संपवली..; हर्षवर्धन राणेच्या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट
'सनम तेरी कसम' या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेला अभिनेता हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवतोय. बऱ्याच वर्षांनंतर त्याचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय.

बॉलिवूडमध्ये बरीच वर्षे संघर्ष केल्यानंतर अखेर अभिनेता हर्षवर्धन राणेला यश मिळू लागलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा ‘एक दिवाने की दिवानियत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने 34 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. हर्षवर्धन आणि चित्रपटातील सहअभिनेत्री सोनम बाजवा यांनी नुकतीच गुजरातच्या स्क्रीनिंगदरम्यान थिएटरमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आणि इंडस्ट्रीतल्या घराणेशाहीवरून टोमणा मारला. ‘एक दिवाने की दिवानियत’ या चित्रपटासोबतच आयुषमान खुरानाचा ‘थमा’ प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही चित्रपटांची कमाई चांगली होत आहे.
पापाराझी अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हर्षवर्धन प्रेक्षकांना म्हणतो, “या दिवाळीत तुम्ही दोन्ही आऊटसाइडर्सच्या चित्रपटांना पाठिंबा दिला. माझ्या चित्रपटासोबतच आयुषमानचाही चित्रपट प्रदर्शित झाला. तुम्ही दोन्ही चित्रपट बघा आणि एंजॉय करा. यावरून लोकांमध्ये चांगला संदेश पोहोचतो की, तुम्ही लोकांनी संपूर्ण बॉलिवूडमधून घराणेशाहीलाच संपवून टाकलं.” हे ऐकताच उपस्थित प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात. हर्षवर्धनसुद्धा हात जोडून त्यांचे आभार मानतो.
View this post on Instagram
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ही पहिली व्यक्ती असेल जी दुसऱ्यांच्या चित्रपटाबद्दलही चांगलं बोलतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘तो आयुषमानच्या चित्रपटाबद्दलही चांगलं बोलला, त्याने मनंच जिंकून घेतलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘प्रेक्षकांकडेच सगळी पॉवर असते, कलाकारांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी’, असंही काहींनी लिहिलं आहे.
थमा आणि एक दिवाने की दिवानियत हे दोन्ही चित्रपट 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाले. ‘थमा’ या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 78 कोटी रुपये आणि जगभरात 110 कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसरीकडे मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘एक दिवाने की दिवानियत’ या रोमँटिक ड्रामाने भारतात 34 कोटी रुपयांचा आणि जगभरात 45 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. अवघ्या 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आधीच सुपरहिट ठरला आहे. हर्षवर्धन राणेच्या करिअरमधील हा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’सह या वर्षातील इतर 26 चित्रपटांना ओपनिंगच्या बाबतीत मागे टाकलं आहे.
