‘कर गई चुल्ल’ फेम गायकावर जीवघेणा हल्ला; 2-3 राऊंड फायरिंग करून पळाले आरोपी
प्रसिद्ध गायक आणि रॅपर राहुल फाजिलपुरियाच्या गाडीवर अज्ञातांनी गोळीबार केला. दोन ते तीन राऊंड गोळीबार केल्यानंतर ते तिथून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी तपास सुरू केला.

प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि रॅपर राहुल फाजिलपुरियावर गुरुग्राममध्ये सोमवारी गोळीबार झाला. या गोळीबारातून तो थोडक्यात बचावला. प्राथमिक माहितीनुसार, गुरुग्राममधील एसपीआर रोडवर सोमवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तींनी गायकाच्या गाडीवर दोन ते तीन राऊंड्स गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपी तिथून पळून गेले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेबद्दलची माहिती मिळताच गुरुग्राम पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. हा गोळीबार कोणत्या कारणासाठी आणि कोणी केला, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.
राहुल घटनास्थळावरून सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. गायक राहुल फाजिलपुरियाचं खरं नाव राहुल यादव आहे. त्याने गुरुग्राममधील त्याच्या फाजिलपूर या गावावरून स्वत:चं आडनाव फाजिलपुरिया असं ठेवलंय. हे त्याचं स्टेजवरील नाव आहे. राहुल हरियाणवी संगीतासाठी विशेष ओळखला जातो. हरियाणवी संगीत बॉलिवूडमध्ये घेऊन जाण्यास तो यशस्वी ठरला.
राहुल फाजिलपुरियाचा जन्म 10 एप्रिल 1990 रोजी झाला. त्याने गुरुग्राममधील एका खासगी संस्थेतून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला लहानपणापासूनच गायन आणि अभिनयात रस होता. देसी स्टाइल आणि हटके रॅपिंगसाठी तो ओळखला जातो. त्याच्यावरील जीवघेण्या हल्ल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. फाजिलपुरिया हा अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्याने स्वत:च्या जोरावर रॅपच्या विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘कपूर्स अँड सन्स’मधील ‘कर गई चुल’ हे गाणं त्याचं खूप गाजलं होतं.
View this post on Instagram
राहुलने 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. गुरुग्राममधून जननायक जनता पक्षाच्या (जेजेपी) तिकिटावर त्याने निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत भाजपच्या मुकेश शर्मा यांनी त्याचा पराभव केला होता. त्यांनी 1.22 लाखांहून अधिक मतांनी ही जागा जिंकली होती. सोशल मीडियावर राहुलची प्रचंड लोकप्रियता आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
राहुल हा ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवचा जवळचा मानला जातो. 2023 मध्ये एका रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाच्या वापराच्या संशयास्पद प्रकरणात तो वादात सापडला होता. या प्रकरणातील चौकशीदरम्यान एल्विशने पोलिसांना सांगितलं होतं की, सापांची व्यवस्था फाजिलपुरियाने केली होती. राहुल फाजिलपुरियाचे ‘कर गई चुल’, ‘टू मेनी गर्ल्स’, ‘व्हिआयपी’, ‘जट लाइफ ठग लाइफ’, ‘पार्टी’ यांसारखी गाणी आणि अल्बम हिट झाले आहेत.
